लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेने (पीएमसी) दाखल केलेल्या कर्ज फसवणूक प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) हैदराबादमधील किंग कोटी रोडवरील सुलतान बाजारमधील ॲबिड्स येथील हॉटेल वन कॉन्टिनेंटच्या दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या आणि पाचव्या मजल्यावरील ४३ कोटी ८४ लाख रुपयांच्या स्थावर मालमत्तेवर टाच आणली.

पंजाब अँड महाराष्ट्र सहकारी बँकेने जॉय थॉमस, वरयम सिंग (पीएमसी बँकेचे संचालक), राकेश कुमार वाधवान, सारंग वाधवन आणि इतरांविरुद्ध दाखल केलेल्या प्राथमिक तपास अहवालच्या (एफआयआर) आधारे इडीने तपास सुरू केला आहे. मेसर्स हाउसिंग डेव्हलपमेंट अँड इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड (एचडीआयएल), तिचे प्रवर्तक आणि इतर साथीदारांनी पंजाब आणि महाराष्ट्र सहकरी बँकेविरुद्ध ६११७ कोटी ९३ लाख रुपयांची (मुद्दल २५४० कोटी ९२ लाक रुपये आणि व्याजापोटीचे ३५७७ कोटी ०१ लाख) फसवणूक केली असल्याचे ईडीकडून सांगण्यात आले.

आणखी वाचा- सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये करता येणार चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण; जाणून घ्या कसे?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एचडीआयएल समूहाच्या बँक खात्यांच्या छाननीदरम्यान २००६ ते २०१४ या कालावधीत एचडीआयएलच्या प्रवर्तकांनी हैदराबादमधील संस्थांसोबत ४३ कोटी ८४ लाख रुपयांचा व्यवहार केला होता. राकेश वाधवान यांनी पीएमसी बँकेला अंधारात ठेवून मेसर्स माय पॅलेस सहकारी गृहनिर्माण संस्था आणि मेसर्स अनिश कन्स्ट्रक्ट या कंपनीसोबत हा व्यवहार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे. यापूर्वी १७ ऑक्टोबर २०१९ रोजी राकेश वाधवन आणि त्यांचा मुलगा सारंग वाधवन यांना मनी लॉड्रिंगच्या गुन्ह्यात अटक करण्यात आली होती आणि दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. आतापर्यंत ईडीने याप्रकरणात एकूण ७१९ कोटी ११ लाख रुपयांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.