औषधांच्या गोळ्या आयुष्यभर खात राहिल्याने केवळ कंपनीचा फायदा होतो, रुग्णांचा नाही. कॅल्शिअमच्या गोळ्या आयुष्यभर खात राहिल्याने काहीही फायदा होत नाही. रोज औषधांच्या गोळ्या खात राहण्याऐवजी योग्य आहारावर भर दिला तर बदललेल्या जीवनशैलीतही आजारांवर मात करता येईल, असा ‘आरोग्याहार मंत्र’ वैद्य खडीवाले यांनी बुधवारी ‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ कार्यक्रमात दिला.
अन्न हा सर्वच संस्कृतीचा केंद्रबिंदू. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येकाचा अन्नाशी संबंध येत असतो आणि तरीही रोजच्या आहाराबाबत सामान्यांच्या मनात त्याविषयी कितीतरी किंतु, परंतु, शंका, प्रश्न असतात. अशी सुरुवात करत आहार कसे पूर्णब्रह्म आहे, त्याचे प्रत्यंतर वैद्य खडीवाले यांनी दिले. लोकसत्ता वाचकांच्या मनातील आहाराबाबच्या या प्रश्नांना वैद्य खडीवाले यांनी रोचक पद्धतीने, खुमासदार किश्शांनी आणि प्रात्यक्षिकांसह दिलेल्या उत्तरांनी लोकसत्ता पूर्णब्रह्म कार्यक्रम उत्तरोत्तर रंगत गेला.  
औषध कंपन्यांची धन करायची सोडून योग्य आहार घ्या, असा सल्ला वैद्य खडीवाले यांनी दिला. वैद्य खडीवाले यांच्याकडून शंकांचे निरसन करून घेण्यासाठी कार्यक्रमाच्या नियोजित वेळेआधीच श्रोत्यांनी सभागृह खच्चून भरले होते. वैद्य खडीवाले यांच्या निवेदनानंतर प्रश्नांचा पाऊस पडू लागला. सकाळी न्याहारी कोणती असावी, वजन कमी कसे करावे, मधुमेहींनी आहार कसा ठेवावा, रात्री काय खावे, लहानग्यांच्या बद्धकोष्टावर काय उपाय, बारा महिने असलेल्या सर्दीचे काय करावे.. अशा शेकडो शंका, प्रश्न उपस्थित श्रोत्यांनी विचारले. त्यातील निवडक प्रश्नांना वैद्य खडीवाले यांनी उत्तरे दिली. कोलेस्टेरॉल वाढले असल्यास कोणता आहार घ्यावा याविषयीच्या प्रश्नाला उत्तर देताना तर खडीवाले यांनी व्यासपीठावरच कोलेस्टेरॉलचे प्रमाण पाहण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. सोप्या शब्दांत, श्रोत्यांशी संवाद साधत खडीवाले यांनी आहारासोबतच अपचन, बद्धकोष्ठ, निद्राविकार, सर्दी यावर घरगुती उपायही सांगितले. अन्न हा मराठी माणसाच्या प्रेमाचा विषय आहे. मात्र अतिप्रेमामुळे त्याकडे कदाचित दुर्लक्ष झाल्यासारखे वाटते. जेवणाचा संबंध हा रंग, रुप, गंधाशी आणि शरीरासोबत मनाशीही असतो. त्यामुळे नेमके काय आणि कसे खावे हे महत्त्वाचे आहे, असे लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर म्हणाले. या कार्यक्रमात गोल्डन विनर प्रस्तुत, पितांबरी द्वारा सहप्रायोजित आणि ड्रीम व्हेकेशन्सने पुरस्कृत केलेले लोकसत्ता पूर्णब्रह्म पुस्तकाचे यावेळी लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर, प. य. वैद्य खडीवाले, गोल्डन विनरचे हेन्री फर्नाडिस, ड्रीम व्हेकेशनचे हेमंत जोशी आणि  पितांबरीचे मिलींद घारपुरे यांच्या उपस्थितीत प्रकाशन झाले.  
पहिली आवृत्ती संपली, दुसरी लवकरच!
लोकसत्ता पूर्णब्रह्म या पुस्तकाची पहिली आवृत्ती वाचकांच्या उदंड प्रतिसादामुळे कार्यक्रमाच्या ठिकाणीच संपली. या पुस्तकाची दुसरी आवृत्ती लवकरच प्रकाशित होणार आहे.
‘लोकसत्ता पूर्णब्रह्म’ पुस्तकाचे बुधवारी प. य. वैद्य खडीवाले, ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर, ‘गोल्डन विनर’चे हेन्री फर्नाडिस, ‘ड्रीम व्हेकेशन’चे हेमंत जोशी, संतोष वेर्णेकर आणि  पितांबरीचे मिलींद घारपुरे यांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले.   (छायाचित्र : प्रशांत नाडकर)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Purnabramha published dont help medicine companies vaidya khadiwale
First published on: 24-04-2014 at 02:35 IST