मुंबई : मुंबई महानगरपालिकेच्या पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्राला पडघा येथील १०० केव्ही वीज उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा आज सोमवारी सकाळी अचानक खंडीत झाला. त्यामुळे पालिकेची जलशुद्धीकरण यंत्रणा बंद पडली. ही यंत्रणा सुरू करण्यात पालिकेच्या यंत्रणेला यश आलेले असले तरी मुंबईच्या पाणीपुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. पाणी पुरवठ्यात १० ते २० टक्के पाणी कपात करण्यात आली असून मंगळवारी सकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होईल अशी शक्यता पालिका अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील वीजपुरवठा अचानक बंद झाल्यामुळे सकाळी पालिकेच्या पिसे येथून उदंचन केले जाणारे पाणी देखील थांबवावे लागले. त्यानंतर पालिकेच्या यंत्रणेने युद्ध पातळीवर हालचाली करुन, वीज पारेषण कंपनीशी समन्वय साधून सकाळी ११ वाजता दुसऱ्या बाजुने पर्यायी वीजपुरवठा सुरु करण्यात यश मिळवले. त्यामुळे मुंबईला होणारा पाणीपुरवठा खंडीत झाला नाही. मात्र या वीज बिघाडाच्या कालावधीत बंद पडलेली यंत्रणा पूर्वपदावर येईपर्यंत पाणीपुरवठा करणाऱ्या संतुलन जलाशयांमध्ये (रिझरवॉयर) पाणी पातळी खालावली. तसेच मुख्य जलवाहिन्या रिक्त झाल्या होत्या. या जलवाहिन्या पुन्हा भरण्यास २४ तासांचा कालावधी लागत असल्यामुळे मुंबईतील बहुतांशी भागातील पाणी पुरवठ्यावर त्याचा परिणाम झाला. काही ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा झाला. दरम्यान, मंगळवारी सकाळपर्यंत पाणी पुरवठा सुरळीत होण्याची शक्यता पालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे संपूर्ण पश्चिम उपनगरे, तसेच शहर विभागातील वरळी, प्रभादेवी, दादर, माहीम, धारावी, कुलाबा, चर्चगेट येथील पाणीपुरवठ्यात पुढील २४ तासांसाठी १० टक्के पाणीकपात करण्यात आली.

हेही वाचा – तरुणीचे अश्लील चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित, परदेशातून आरोपी आल्यानंतर विमानतळावर पकडले

हेही वाचा – मुंबई : आईसक्रीमचे आमीष दाखवून ४ वर्षांच्या मुलीचे अपहरण व विनयभंग, आरोपीला अटक

पूर्व उपनगरे, तसेच शहर विभागातील वडाळा, नायगाव, शिवडी, लालबाग, परळ येथे २० टक्के पाणीकपात करण्यात आली. वीज पारेषण कंपनीकडून वीज उपकेंद्र ते पांजरापूर या संपूर्ण मार्गावर वीज बिघाड कुठे झाला आहे, त्याचा शोध घेतला जात आहे. मात्र तोपर्यंत पर्यायी वीज पुरवठ्याआधारे पांजरापूर जलशुद्धीकरण केंद्रातील यंत्रणा टप्प्या-टप्प्याने पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्यासाठी काही अवधी आवश्यक आहे. त्यानंतर पाणीपुरवठा पूर्ववत होणार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.