शिक्षण विभागाचा निर्णय; ऑनलाइन परीक्षेची मागणी फेटाळली

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वर्षभर ऑनलाइन वर्ग, परीक्षेच्या सरावाचा अभाव या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परीक्षेचे स्वरूप बदलण्याची पालक आणि विद्यार्थ्यांची मागणी शिक्षण विभागाने अमान्य केली. मात्र, विद्यार्थ्यांना परीक्षेची तयारी करणे सुकर व्हावे यासाठी प्रश्नसंच देण्यात येणार आहेत.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षा एप्रिलअखेरीस घेण्याचे नियोजन केले आहे. परीक्षेचे सविस्तर वेळापत्रकही जाहीर करण्यात आले. मात्र, आता राज्यात अनेक ठिकाणी करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे परीक्षा ऑनलाइन घेण्याची मागणी पालक आणि विद्यार्थ्यांकडून सातत्याने करण्यात येत आहे. यंदा वर्षभर शाळा ऑनलाइन झाल्यामुळेही विद्यार्थ्यांना लेखनाचा सराव नाही, विद्यार्थ्यांची तयारी पुरेशी झालेली नाही अशी कारणे पालकांकडून पुढे करण्यात येत आहेत. याबाबत शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी पालक संघटना आणि शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांची गुरुवारी बैठक घेतली.

आता प्रश्नपत्रिका काढणे, परीक्षांचे नियोजन अशी तयारी अंतिम टप्प्यात आली असून, परीक्षा पद्धत, प्रश्नपत्रिकांचे स्वरूप यामध्ये बदल होणे शक्य नसल्याचे राज्य मंडळाने स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विद्यार्थी संख्या, साधनांची उपलब्धता याचा विचार करता परीक्षा ऑनलाइन घेणेही शक्य नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. महत्त्वाच्या विषयाच्या परीक्षेत अंतर ठेवण्याची मागणीही अमलात आणणे शक्य नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. पालकांच्या बहुतेक मागण्या शिक्षण विभागाने फेटाळून लावल्या. मात्र, विद्यार्थ्यांना प्रश्नांचे स्वरूप लक्षात यावे, सराव व्हावा यादृष्टीने संदर्भासाठी विषयानुरूप प्रश्नसंच देण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) हे प्रश्नसंच तयार करत असून पुढील आठवड्यापर्यंत ते जाहीर करण्यात येतील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

विद्यार्थ्यांच्या शाळेतच परीक्षा केंद्र

करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांना दूरच्या परीक्षा केंद्रात जावे लागू नये, यासाठी विद्यार्थी शिकत असलेल्या शाळेतच परीक्षा केंद्र देण्यात येणार आहे. याबाबतचे नियोजन करण्यात येत आहे.

तोंडी परीक्षा लेखीनंतर : नियोजित वेळापत्रकानुसार तोंडी आणि प्रात्यक्षिक परीक्षा लेखी परीक्षेपूर्वी होणे अपेक्षित आहे. मात्र, काही भागांत या परीक्षा घेता आल्या नाहीत, तर त्या लेखी परीक्षेनंतर घेता येऊ शकतील असेही शिक्षण विभागाने स्पष्ट केले. त्यासाठी स्वतंत्र शुल्क आकारण्यात येऊ नये अशा सूचना शिक्षणमंत्र्यांनी यावेळी दिल्या.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Question set for 10th and 12th class students abn
First published on: 12-03-2021 at 00:55 IST