मुंबई: जलसंपदामंत्री विखे पाटील यांचा कालचा रुबाब देखणा होता. मनोज जरांगे पाटील यांच्यासोबतचा त्यांचा वावर तर एखाद्या मुख्यमंत्र्यासारखा होता.. अहो ते काल एक दिवसाचे मुख्यमंत्रीच होते… राज्यमंत्रिमंडळाच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यामध्ये रंगलेल्या या संवादाने संपूर्ण मंत्रिमंडळात एकच हशा पिकला..
आपल्या विविध मागण्यांसाठी मराठा समाजाने मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात गेले पाच दिवस आझाद मैदानात उपोषण- आंदोलन केले होते. जरांगे यांच्यासारख्या कसलेल्या मातब्बल नेत्यांशी संवाद साधून त्यांचे मन वळविण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तितक्याच ताकदीचे अनुभवी अशा जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपविली होती.
यापूर्वी मराठा समाज आरक्षण मंत्रिमंडळ उपसमितीच्या अध्यक्षपदाची धुरा उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. मात्र यावेळी जरांगे पाटील तयारीने मुंबईत येत असल्याचे लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ उपसमितीची पुर्नरचना करुन ही जबाबादारी विखे पाटील यांच्यावर सोपविली होती. मराठा समाजाच्या आंदोलना दरम्यान विखे पाटील यांनी नेहमीची वारंवार जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करण्याची प्रथा बंद केली. त्यांनी सुरूवातीस न्या. संदीप शिंदे यांना जरांगे यांच्याशी चर्चा करण्यास पाठविले. मात्र जरांगे यांनी शिंदे यांचा प्रस्ताव फेटाळल्यानंतर विखे यांनी पुढे चर्चेला जाणे टाळले.
आंदोलकांच्या सर्व मागण्यांवर जरांगे यांना मान्य होईल असा तोडगा काढून आणि त्याला मुख्यमंत्री, दोन्ही मुख्ममंत्र्यांची तसेच मंत्रिमंडळ उपसमितीची मान्यता घेऊन विखे पाटील जरांगे यांच्याशी चर्चेला गेले. आणि काही वेळातच जरांगे यांचे उपोषण सोडविले. साहजिकच आजवर अनेक मंत्र्यांना वेठीस धरणारे जरांगे पाटील यावेळी एकच भेटीत विखेच्या जाळ्यात अडकल्याने सरकारने मंगळवारी सुटकेचा नि:श्वास सोडला होता. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत सर्वांच्या नजरा विखे पाटील यांच्याकडे लागल्या होत्या.
प्रत्यक्षआत मात्र आजची बैठक हसत खेळत पार पडल्याचे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस तर निवांत होते. यावेळी सर्वांनीच विखे पाटील यांचे कौतूक केले. अजित पवार यांनी तर विखे पाटील काल भरलेच रुबाबात दिसत होते असा टोला मारला. त्यावर अहो ते रुबाबातच नव्हे तर एक दिवसाचे मुख्यमंत्री म्हणून वावरत होते अशी मिश्किल टिप्पणी मुख्यमंत्र्यांनी केली.