मुंबई: विधानसभेच्या कामकाज सल्लागार समिस्मध्ये स्थान देण्याची शिवसेनेची मागणी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी बुधवारी फेटाळून लावली. राज्य विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन १७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या अधिवेशनाचा कालावधी आणि कामकाजासंदर्भात चर्चा करण्यासाठी कामकाज सल्लागार समितीची बैठक बोलाविण्यात आली आहे.

या समितीमध्ये शिवसेनेचा गटनेता म्हणून आपल्याला तसेच प्रतोद म्हणून सुनिल प्रभू यांचा समावेश करण्याची मागणी शिवसेना गटनेते  अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे पत्राद्वारे केली होती. मात्र त्यांची मागणी फेटाळून लावत अध्यक्ष नार्वेकर यांनी कामकाज सल्लागार समितीची घोषणा केली. या समितीत सत्ताधारी शिंदे गट, भाजप तसेच विरोधी बाकांवरील काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांना स्थान देताना अपक्ष आणि शिवसेनेला मात्र स्थान देण्यात आलेले नाही. 

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे समितीचे प्रमुख असतील. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांच्यासह शिंदे गटाचे दादाजी भुसे, उदय सामंत तसेच विरोधी पक्षातील जयंत पाटील, बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण हे समितीचे सदस्य असतील. याशिवाय, उपाध्यक्ष नरहरी झिरवळ, आशिष शेलार, छगन भुजबळ आणि अमिन पटेल यांचा निमंत्रित सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे.