उपनगरी रेल्वेच्या जादा फेऱ्या, कल्याण-कर्जत शटल फेऱ्या, कल्याण-वाशी लोकलसेवा अशा असंख्य अपेक्षांनिशी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे डोळे लावून बसलेल्या मुंबईकर प्रवाशांच्या पदरी रेल्वे अर्थसंकल्पाने अखेर निराशा पडली. चर्चगेट ते विरार आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस ते पनवेल दरम्यानच्या उन्नत मार्गाची उभारणी आणि हार्बर मार्गावरील उन्नत मार्ग मुंबईतील मेट्रोशी एकीकृत करण्याच्या घोषणेपलिकडे प्रभू यांनी मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवेसाठी एकही आश्वासन दिले नाही. एकीकडे तिकीट दरांत वाढ न करण्याच्या रेल्वेमंत्र्यांच्या निर्णयाचे स्वागत करतानाच प्रवासीसुविधांच्या पातळीवर हा अर्थसंकल्प ‘व्यर्थसंकल्प’ असल्याची टीका प्रवासी संघटना व तज्ज्ञांनी केली आहे.
तब्बल ८४ लाख प्रवाशांची दररोज वाहतूक करणारी मुंबईची उपनगरी सेवा नेहमीच गर्दीने ओसंडून वाहत असते. प्रवाशांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढवण्याची मागणी सातत्याने होत असते. मात्र, यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पात लोकलच्या फेऱ्या वाढवण्याबाबत कोणतेही भाष्य करण्यात आलेले नाही. याउलट ‘वाढत्या गर्दीवर तोडगा म्हणून राज्य सरकारांनी कार्यालयीन वेळांमध्ये बदल करता येईल का, हे पाहावे,’ असा सल्ला प्रभू यांनी अर्थसंकल्प सादर करताना दिला. नाही म्हणायला, चर्चगेट-विरार आणि छत्रपती शिवाजी टर्मिनस-पनवेल या उन्नत (एलिव्हेटेड) मार्गाची घोषणा त्यांनी केली. मात्र, गेल्या काही वर्षांपासून चर्चेत असलेल्या या मार्गाना केंद्र सरकारच्या ‘निती’ आयोगाने काही महिन्यांपूर्वीच मान्यता दिली असल्याने त्यात नवीन काही नाही, असे प्रवासी संघटनांचे म्हणणे आहे. या मार्गानाही अद्याप केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली नाही. फलाट आणि रेल्वेगाडीच्या पोकळीत प्रवासी पडून होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी फलाटांची उंची वाढवण्याची रेल्वेमंत्र्यांची घोषणाही जुनीच आहे.
ठाणेपलीकडे टिटवाळा-मुरबाड रेल्वेमार्गासाठी मंजुरी देण्यात आली आहे. त्याचबरोबर जसई-उरण या १० किमीच्या मार्गासाठी १९ कोटी रुपये देण्यात आले आहे. मात्र, कल्याण-कर्जतदरम्यान शटल सेवा सुरू करण्याची तसेच कल्याण-वाशीदरम्यान ‘ट्रान्सहार्बर’ वाहतूक सुरू करण्याबाबतही रेल्वे अर्थसंकल्पात कोणताही उल्लेख नाही.

अपेक्षाभंग
* रेल्वे मानकानुसार प्रत्येक स्थानकावर २ स्वच्छतागृहे व २ मुताऱ्या असणे बंधनकारक आहे. त्यातही रेल्वे स्थानकांवर स्वच्छतागृहांची कमतरता असूनही कोणतीही तरतूद करण्यात आली नाही.
* लोकलमधून पडून वर्षभरात सुमारे ७०० जणांचा मृत्यू झाला. यामुळे हे अपघात रोखण्यासाठी अधिक गाडय़ा सुरू करण्याची तसेच संबंधित उपाययोजना करण्याची अपेक्षा होती. मात्र त्यातही प्रवशांची निराशा झाली आहे.
* प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक सीसीटीव्ही कॅमेरे आणि अत्याधुनिक उपाययोजना करणे अपेक्षित होते. वर्षभरात रेल्वेच्या हद्दीत होणाऱ्या गुन्ह्य़ांचे प्रमाण सुमारे दीड हजारांवर आहे.
* प्रत्येक स्थानकावर दोन पाणपोया असणे अपेक्षित आहे. मात्र त्याबाबत उदासीनता दिसून आली आहे.
’ मुंबईकरांसाठी नवीन गाडय़ांसह उपनगरीय गाडय़ांच्या फेऱ्या वाढवणे अपेक्षित होते.
’ रेल्वे रूळ ओलांडताना होणारे अपघात टाळण्यासाठी अनेक स्थानकांवर पादचारी पुलांची संख्या वाढवण्यावर भर दिला जाण्याची अपेक्षा होती.

आमच्या मते..
उपनगरीय प्रवाशांची निराशा
यंदाच्या रेल्वे अर्थसंकल्पातून उपनगरीय रेल्वे प्रवाशांची निराशा झाली आहे. मुंबईसाठी नव्याने कोणतीही ठोस तरतूद करण्यात आली नसून उपनगरीय रेल्वेतील गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी नव्या लोकल फेऱ्यांची घोषणा होईल अशी आमची अपेक्षा होती, मात्र अशी घोषणाच न झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. कारण, फेऱ्या वाढल्या असत्या तर रेल्वेतून होणाऱ्या अपघातांना आळा बसू शकला असता, पण अर्थसंकल्प मांडताना या महत्त्वाच्या बाबीचा विचारच करण्यात आला नाही. दिव्यात गेल्या २ जानेवारीला झालेल्या आंदोलनानंतर या घटनेची दखल घेत रेल्वे मंत्री स्वत ठाण्याला आले होते. त्यामुळे त्यानंतर दिवा-सीएसटी लोकल सुरू होईल अशी आम्हांला आशा होती. मात्र अशा लोकलचीही घोषणा करण्यात आलेली नाही.
आदेश भगत, दिवा रेल्वे प्रवासी संघटना

जुन्या घोषणांची पूर्तता करा
रेल्वे अर्थसंकल्प मांडताना मी काही जादूगार नाही, त्यामुळे मी स्वप्ने दाखवू शकत नाही. असे रेल्वे मंत्र्यांचे म्हणणे आम्हांला मान्य आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांपासून ज्या घोषणा करण्यात आल्या होत्या किमान त्यांची तरी पूर्तता करण्यात यावी. आजवर झालेल्या घोषणा जरी पूर्ण झाल्या तरी देखील येथील प्रवाशांना काहीसा दिलासा मिळू शकेल. आमच्या प्रवाशांचे रोजच्या प्रवासात हाल होत असून त्यांचा जीव जात आहे. या प्रवाशांना जीवनदान द्यावे अशी मागणी आता रेल्वे मंत्र्यांकडे करण्याची वेळ आली आहे.
लता अरगडे, उपाध्यक्ष रेल्वे प्रवासी महासंघ

संतुलित रेल्वे अर्थसंकल्प
रेल्वे अर्थसंकल्प संतुलित असून रेल्वेतून होणाऱ्या मृत्यूबद्दल रेल्वे मंत्र्यांनी गांभिर्य व्यक्त केले आहे. महाराष्ट्रातील असूनही देशाला समोर ठेऊन सुरेश प्रभू यांनी अर्थसंकल्प मांडला ही स्वागतार्ह बाब आहे. मात्र, गेल्या संकल्पात एमयुटीपी – २ प्रकल्पाअंतर्गत ७२ रेक्स मिळणार होते. ते मिळाले तर नाहीच मात्र ते कधी मिळणार याचा उल्लेख देखील यंदाच्या अर्थसंकल्पात करण्यात आलेला नाही. यांमुळे मुंबईकर प्रवाश्यांची निराशाच झाली आहे. आम्हांला नवीन स्वप्ने दाखवली नाहीत तरी चालतील मात्र जी यापूर्वी दाखवली आहेत ती साकार होणे हे प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे.
सुभाष गुप्ता, अध्यक्ष, यात्री संघ

निराशाजनक संकल्प
यावर्षी रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मांडलेला अर्थसंकल्प नैराश्यजनक असून या संकल्पात महाराष्ट्राला ठेंगा दाखविण्यात आला आहे. इतका निराशाजनक अर्थसंकल्प यापूर्वी आमच्या पाहण्यात आलेला नसून महाराष्ट्रातील खासदारांनी याबद्दल आवाज उठविला पाहीजे. कल्याण, कर्जत, कसारा या भागातील प्रवाशांना कोणताच लाभ नाही. रेल्वे अपघातांना आळा बसण्यासाठी ठोस उपाय करण्यात आलेले नाहीत. बुलेट ट्रेनमध्ये प्रवाशांच्या स्वागतासाठी हवाई सुंदऱ्यांसारख्या स्त्रीया सेवेला असणार यांमुळे हा संकल्प केवळ श्रीमंतासाठी आहे की काय असा संशयही येतो.
नंदकुमार देशमुख, अध्यक्ष, ठाणे रेल्वे प्रवासी संघ