मुंबई- रेल्वे स्थानकांवर प्रवाशांच्या बॅगा तपासणीच्या नावाखाली रेल्वे पोलिसांकडूनच लूट होत असल्याच्या वाढत्या घटनांची गंभीर दखल पोलीस आयुक्तांनी घेतली आहे. त्यासाठी बॅगांच्या तपसाणीसंदर्भात नवीन नियमावली जाहीर करण्यात आली असून बॅगांची तपासणी सीसीटीव्हीच्या कक्षेत आणि गणवेषातच करणे बंधनकारक करण्यात आले आहे.
रेल्वे पोलिसांनी तपासणीच्या नावाखाली प्रवाशांना लुटण्याच्या काही घटना घडल्या होत्या. प्रवाशांकडून खंडणी उकळल्याप्रकऱणी मुंबई सेंट्रल, वांद्रे आणि वसई मधील तीन पोलिसांना निलंबितही करण्यात आले होते. या घटनेमुळे रेल्वे पोलीस दलाची बदनामी झाली होती. या पार्श्वभूमीवर रेल्वे पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकार्यांची बैठक घेऊन बॅग तपासणीची प्रक्रिया पारदर्शक, सुरक्षित आणि नियमबद्ध ठेवण्यासाठी नवे आदेश दिले आहेत. या बैठकीला मध्य व पश्चिम रेल्वेचे उपायुक्त तसेच मुंबईतील सर्व विभागीय रेल्वे सहाय्यक पोलीस आयुक्त उपस्थित होते.
काय आहेत नवीन नियम?
बॅगांची तपासणी केवळ वरिष्ठ पोलीस निरीक्षक किंवा प्रभारी अधिकाऱ्यांच्या प्रत्यक्ष देखरेखीखालीच केली जाणार आहे. ही तपासणी करताना वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थिती अनिवार्य असेल. बॅगांच्या तपासणीदरम्यान संपूर्ण प्रक्रिया सीसीटीव्हीवर चित्रित होईल. बंद खोली, सीसीटीव्ही नसलेली किंवा एकांतात तपासणी होणार नाही. सर्व पोलीस अधिकारी आणि कर्मचारी शासकीय गणवेशात आणि ठरलेल्या नियमानुसारच बॅगेची तपासणी करतील. साध्या वेषात कुणालाही तपासणी करता येणार नाही.
कोणताही पोलीस कर्मचारी कर्तव्यादरम्यान साध्या कपड्यांमध्ये दिसता कामा नये, याची जबाबदारी प्रभारी अधिकाऱ्याची असेल. गृहरक्षक (होमगार्ड) महाराष्ट्र सुरक्षा बला ( एमएसएफ) किंवा कोणत्याही खासगी व्यक्तीला बॅगांची तपासणीत करण्याची परवानगी नाही. गृहरक्षकाकडून गैरवर्तन होऊ नये, याची पूर्ण जबाबदारी संबंधीत पोलीस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांची असेल. तपासणीसाठी नियुक्त कर्मचारी दर १५ दिवसांनी बदलले जातील तर कार्यालयीन कर्मचाऱ्यांची कामाची वेळ (ड्युटी) दर ३ महिन्यांनी बदलण्यात येणार आहे.
बंद सीसीटीव्ही कार्यरत करा
सर्व रेल्वे स्थानक परिसरातील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे १० सप्टेंबरपर्यंत सुरू करणे बंधनकारक करण्यात आले आहे. गैरकृत्याचा आरोप असलेल गृहरक्षक, पोलीस कर्मचारी आणि रेल्वे सुरक्षा बलाचे कर्मचारी (जीआरपी) यांची यादी १९ सप्टेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व उपाययोजनांचा उद्देश प्रवाशांची सुरक्षा मजबूत करणे आणि पोलिसांची जबाबदारी निश्चित करणे हा आहे. बॅगांच्या तपासणीच्या प्रक्रियेत हलगर्जीपणा सहन केला जाणार नाही, असा इशारा पोलीस आयुक्त राकेश कलासागर यांनी दिला आहे.