मुंबई : विश्रांती घेतलेल्या पावसाचा मुंबई आणि उपनगरांत बुधवारपासून जोर वाढला आहे. मुंबईतील काही भागांत गुरुवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. दरम्यान, पुढील दोन ते तीन तासांत मुंबईसह ठाणे, पालघर आणि रायगड भागात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.

मुंबई आणि उपनगरांत गुरुवारी पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू झाली आहे. उपनगरातील बोरिवली, दहिसर, वांद्रे परिसरात पहाटेपासून जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईत जोरदार पाऊस नसला तरी हलक्या सरी कोसळत आहेत. दरम्यान, पुढील दोन ते तीन तासांत मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. हा पाऊस साधारण एक तास कोसळणार असल्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्याचबरोबर हवामान विभागाने पुढील दोन दिवसांसाठी मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. उपनगरातील बोरिवली, मालाड, कांदिवली, गोरेगाव परिसरात पावसाचा अधिक जोर दिसून येत आहे.

हेही वाचा – लोकसभेतील चूक जनता पुन्हा करणार नाही! मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास

यंदा लवकर दाखल झालेल्या मोसमी पावसाने काही दिवस विश्रांती घेतली होती. परिणामी मुंबईकरांना उकाड्याचा सामना करावा लागला. दरम्यान, बुधवारपासून मुंबई आणि उपनगरांत पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण होऊन काहीसा दिलासा मिळाला आहे.

नवी मुंबईत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा

मुंबईबरोबरच नवी मुंबई परिसरात आज मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पहाटेपासून नवी मुंबईतील कामोठे, पनवेल, बेलापूर, खारघर परिसरात पावसाला सुरुवात झाली. हा पाऊस साधारण पुढील एक तास सलग राहणार आहे.

डोंबिवली, कल्याण, भिवंडी, उल्हासनगर भागात देखील पुढील एका तासात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. या भागात पहाटेपासून पावसाला सुरुवात झाली आहे.

हेही वाचा – मुंबईतील पाणीपुरवठ्याचे पर्यायी प्रकल्प कागदावरच

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मुंबई महापालिकेच्या पर्जन्यमापक केंद्रावर झालेल्या नोंदीनुसार गेल्या चोवीस तासांत शहरात १९.९८ मिमी, पूर्व उपनगरांत २९.५६ मिमी तर पश्चिम उपनगरांत ५९.३० मिमी पावसाची नोंद झाली.