मुंबई : गेले काही दिवस मुंबईत पाऊस पडत आहे. दिवसभर उकडा आणि उन्हाचा ताप त्यानंतर सायंकाळी पाऊस असे काहीसे वातावरण मुंबईत आहे. दरम्यान, गुरुवारी शहर तसेच उपनगरात सकाळीच पावसाने हजेरी लावली. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा ताप काहीसा कमी होता. दरम्यान, शुक्रवारपासून मुंबईत कोरडे वातावरण राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

मुंबईत मागील काही दिवस सुरू असलेल्या पावसामुळे गारवा निर्माण होऊन मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळाला होता. त्यानंतर गुरुवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. सकाळी ९ नंतर अनेक भागात पावसाने हजेरी लावली. त्यामुळे उकाड्यापासून दिलासा मिळाला. दिवसभर ढगाळ वातावरणामुळे उन्हाचा तापही कमी होता. गेले अनेक दिवस तापमानाचा पारा चढा असल्याने सकाळी ११ नंतरच उन्हाचे चटके सहन करावे लागत होते. अनेकदा तापमानाचा पारा ३५ अंशापुढे नोंदला गेला होता. हवामान विभागाच्या कुलाबा केंद्रात गुरुवारी २९.८ अंश सेल्सिअस तर, सांताक्रूझ केंद्रात ३०.३ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. याचबरोबर दोन्ही केंद्रात गुरुवारी अनुक्रमे २ मिमी आणि १.६ मिमी पावसाची नोंद झाली. दरम्यान, शुक्रवारपासून मुंबईत पावसाची फारशी शक्यता नाही. त्यामुळे पुन्हा उकाड्यात वाढ होण्याचा अंदाज आहे.

पाऊस पडण्याचे कारण काय?

नैऋत्य मोसमी पाऊस माघारी गेल्यानंतर दक्षिण भारताकडून येणारे ईशान्य मोसमी वारे तसेच अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र याचा परिणाम म्हणून मुंबईसह इतर भागात पाऊस पडला.

मुंबईची हवा ‘समाधानकारक’

मुंबईचा हवा निर्देशांक गुरुवारी ६१ इतका होता. म्हणजेच मुंबईची हवा गुरुवारी समाधानकारक श्रेणीत नोंदली गेली. अनेक भागात चांगल्या हवेची नोंद झाली, तर काही भागात समाधानकारक हवा नोंदली गेली. बोरिवली येथील हवा निर्देशांक गुरुवारी ४३, भायखळा ४२, कुलाबा ४३, कांदिवली ४९, भांडूप ४१, मालाड ४० आणि वरळी येथील हवा निर्देशांक ४५ इतका होता. या भागातील हवा चांगल्या श्रेणीत नोंदली गेली होती. शिवडी येथील हवा निर्देशांक मात्र १६९ इतका होता. म्हणजेच येथील हवा मध्यम श्रेणीत नोंदली गेली. गेले काही दिवस पाऊस पडत असल्याने मुंबईची हवा ‘समाधानकारक’ श्रेणीत नोंदली जात आहे.