उद्धव आणि राज ठाकरे समोरासमोर येण्याचे टाळतात, असा आजवरचा अनुभव असला तरी शरद पवार यांच्या अमृत महोत्सवाच्या समारंभात राज यांचे भाषण सुरू असतानाच उद्धव यांचे आगमन झाले. राज यांनी मग संधी साधत ‘बंधू आले आमचे’ असे बोलून भाषण थांबविले व बंधू स्थिरस्थावर होईपर्यंत चक्क प्रतीक्षा केली.
पवारांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता राजकारण, कला, क्रीडा, साहित्य अशा विविध क्षेत्रातील मान्यवरांची रांगच लागली होती. प्रफुल्ल पटेल, सुप्रिया सुळे, अजित पवार, जयंत पाटील सर्वांचे स्वागत करीत होते. राजकीय वैरी एकत्र आल्याचे बघायला मिळाले. माजी मुख्यमंत्र्यांना पहिल्या रांगेत आसने राखीव ठेवण्यात आली होती. मनोहर जोशी आणि नारायण राणे हे शिवसेनेचे दोन माजी मुख्यमंत्री चक्क मांडीला मांडी लावून बसले होते. राणे यांचे आगमन होताच जोशी सरांनी त्यांच्याशी हस्तांदोलन केले. दोघांमध्ये संवादही रंगला. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील आणि अजित पवार यांच्यात गुप्तंगू सुरू होते. मराठी तारका या कार्यक्रमाचे आयोजक मराठी तारकांना बरोबर घेऊन पवारांना शुभेच्छा देण्यासाठी आले होते.
मुकेश अंबानी यांच्यासह सायरस पुनावाला, वेणूगोपाळ धूत, अशोक गांगुली, माधरावराव आपटे आदी उद्योग क्षेत्रातील बडी मंडळी उपस्थित होती. राम प्रधान, अजित निंबाळकर, चित्कला झुत्शी, निला सत्यनारायण या निवृत्त सनदी अधिकाऱ्यांनी हजेरी लावली. अजित वाडेकर, चंदू बोर्डे, दिलीप वेंगसरकर हे क्रिकेटपटू, आयपीएलचे राजीव शुक्ला, सिंबॉयसीस एस. बी. मुजूमदार, ‘केसरी’चे केसरी पाटील, चित्रपट क्षेत्रातील सचिन, विजू खोटे, फॅशन क्षेत्रातील शायना एन. सी. हे उपस्थित होते.
राज्य मंत्रिमंडळातील एकनाथ खडसे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, गिरीश महाजन, गिरीश बापट, विजय शिवतरे, काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे, अशोक चव्हाण, नारायण राणे, माणिकराव ठाकरे, संजय निरुपम, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार, शेकापचे जयंत पाटील हे विविध पक्षांमधील राजकारणी उपस्थित होते.