मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यातून चौफेर टीका केली आहे. शिवसेना आमदारांच्या बंडखोरीवरही राज ठाकरेंनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी बंडखोर आमदारांचा उल्लेख अलीबाबा आणि त्याचे चाळीसजण असा केला. दरम्यान, त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही निशाणा साधला.

राज ठाकरे भाषणात म्हणाले, “जूनमध्ये सगळा तमाशा झाला. अलीबाबा आणि त्यांचे चाळीसजण सुरतला गेले. त्यांना चोर म्हणता येणार नाही कारण ते चोर नाहीत. यांनाच (उद्धव ठाकरे) कंटाळून त्यांनी शिवसेना सोडली. कोव्हिडच्या काळात उद्धव ठाकरे कुणालाच भेटायला तयार नव्हते. एक आमदार आपल्या मुलाला घेऊन उद्धव ठाकरेंना भेटायला गेला. त्यावेळी उद्धव ठाकरेंनी त्या मुलाला बाहेर ठेवलं आणि आमदाराला भेट दिली. हे असं वागल्यानंतर २१ जूनला कळालं आपल्याला एकनाथ शिंदे आमदारांना घेऊन सुरतला गेले. मग पुढे गुवाहाटीला गेले.”

हेही वाचा- “…तेव्हा खूप वेदना होत होत्या”, शिवसेना आणि धनुष्यबाणाच्या वादावर राज ठाकरे पहिल्यांदाच बोलले, म्हणाले…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“आजपर्यंत मला एवढंच माहीत होतं की, शिवाजी महाराज सुरतहून लूट करून महाराष्ट्रात आले होते. पण महाराष्ट्रातून लूट करून सुरतला गेलेले एकनाथ शिंदे पहिलेच आहेत. मग गुवाहाटी आणि गोवा असा प्रवास करत एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून बसले. पण एकनाथ शिंदेंना मला एकच सांगायचं आहे की, महाराष्ट्रासाठी काम करा. उद्धव ठाकरे जिथे सभा घेतात तिथे उत्तर द्यायला सभा घेऊ नका. सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेन्शनचा विषय अडकला आहे तो विषय मिटवा. शेतकऱ्यांचे विषय आहेत ते सगळे प्रश्न हाती घ्या. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्यांना भेटा… सभा घेत फिरू नका?” असंही राज ठाकरे म्हणाले.