मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या ‘अँटेलिया’ या घराबाहेर स्फोटकं ठेवल्याच्या घटनेवरून ठाकरे सरकारवर गंभीर आरोप केले. तसेच हे सर्व सहज होत नाही असं सांगत देशातील इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते. ही हिंमत कशी होते? असा सवाल उपस्थित केला. हा विषय सगळीकडे भरकटवत नेला जात आहे, असंही राज ठाकरे यांनी नमूद केलं. ते गुढीपाडव्यानिमित्त मुंबईतील शिवाजी पार्कवर आयोजित सभेत बोलत होते.

राज ठाकरे म्हणाले, “तुम्हाला आठवत असेल माझी पत्रकार परिषद झाली होती आणि त्या पत्रकार परिषदेत मी सांगितलं होतं. मुकेश अंबानींच्या घराखाली बॉम्ब ठेवला गेला. कोणीतरी वझे जो कुठे होता तर शिवसेनेत. तो माणूस एका गाडीमध्ये जिलेटीन्स ठेवतो आणि या देशातील सगळ्यात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जाऊन स्फोटकांची गाडी ठेवतो. हिंमत कशी होते?”

“हे काही सहज झालं का हो?”, राज ठाकरेंचा सवाल

“हे काही सहज झालं का हो? एका पोलीस अधिकाऱ्याला वाटलं, त्याने गाडी घेतली, गाडीत जिलेटीन टाकल्या आणि एका उद्योगपतीच्या घराबाहेर नेऊन ठेवली. मी तेव्हा देखील तुम्हाला सांगितलं होतं की याचं उत्तर तुम्हाला सापडणार नाही. याचं उत्तर मिळणार नाही. हे विषय सगळीकडे भरकटवत नेणार. तुम्हाला भरकटवणं, वेगवेगळ्या विषयांकडे नेणं अशी ती वेगळी ताण आहे,” असं राज ठाकरे यांनी सांगितलं.

“देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि…”

राज ठाकरे म्हणाले, “आज कोणीच त्या विषयावर बोलत नाही. देशाच्या इतक्या मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर बॉम्बची गाडी सापडते आणि त्याचं उत्तर अजूनपर्यंत महाराष्ट्राला मिळत नाही. देशाला मिळत नाही. एक पोलीस अधिकारी जेलमध्ये जातो, त्यानंतर मुंबईच्या आयुक्तांना काढून टाकलं जातं, मुंबईचा आयुक्त म्हणतो गृहमंत्र्याने १०० कोटी मागितले. गृहमंत्री जेलमध्ये जातो. हे सगळं तुम्हाला आठवतं का?”

हेही वाचा : “जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार”, राज ठाकरेंचा गंभीर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“तुमच्या स्मरणशक्तीचा ते आजपर्यंत फायदा घेत आलेत”

“हे सर्वजण विसरले, परत निवडणुका येणार, पुन्हा नवीन प्रचार होणार, नवीन गोष्टी होणार. आमच्याशी ज्याने गद्दारी केली, त्रास दिला ते सर्व आम्ही विसरून जातो आणि पुढच्या नवीन गोष्टी बघत बसतो. याच तुमच्या स्मरणशक्तीचा ते आजपर्यंत फायदा घेत आलेत,” असंही राज ठाकरेंनी नमूद केलं.