दाऊद पाकिस्तानातून स्वतःची यंत्रणा सांभाळत असताना तो एकनाथ खडसेंना फोन करतो म्हणजे त्याच्यावर एवढी वाईट वेळ आली आहे का? असे म्हणत राज ठाकरे यांनी एकनाथ खडसे यांची खिल्ली उडवली आहे. विलेपार्ले येथील दीनानाथ मंगेशकर सभागृहात यूपीएससी आणि एमपीएससी परीक्षेत यश संपादन केलेल्या महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांचा राज ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.
कथित दाऊद कॉल प्रकरण, पीए गजानन पाटील लाच प्रकरण आणि एमआयडीसी प्लॉट प्रकरणी एकनाथ खडसे यांना आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणांवरुन विरोधकांसोबतच शिवसेनेनेही टीका केल्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनीही एकनाथ खडसे यांची खिल्ली उडवली. समारंभावेळी भाषण करताना राज ठाकरे म्हणाले, दाऊद पाकिस्तानमधून स्वत:ची यंत्रणा संभाळतो. तो तिथून खडसेंना कशाला फोन करेल? एवढी वाईट वेळ त्याच्यावर आली आहे का? आपल्याकडे काहीही झालं की लगेच तर्कवितर्क लावले जातात. सगळी मज्जा मज्जा चालली आहे, या शब्दांत राज ठाकरेंनी एकनाथ खडसेंना टोला लगावला.
महाराष्ट्रात मराठी तरूणांना आधी नोक-या मिळाल्या पाहिजेत. त्यानंतर उरलेल्या नोक-या बाकीच्यांना दिल्या जाव्यात, असा इशाराही राज यांनी यावेळी दिला.