मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त शिवनेरी, रायगडा, राजगडावर जिथे फक्त शिवरायांचे नाव असले पाहिजे तिथे नमो पर्यटन केंद्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे काढायला निघाले आहेत. मुख्यमंत्रीपदासाठी शिंदे यांची ही चाटूगिरी आहे. त्यांनी नमो पर्यटन केंद्र गडावर वर खाली कुठेही उभे केले तरी फोडून टाकू, असा इशारा मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिला. स्वाभिमान किती गहाण टाकायचा याला काही मर्यादा आहेत. एकनाथ शिंदे यांच्या खात्याकडून एक शासन निर्णय काढण्यात आला. तो वाचल्यानंतर तळपायाची आग मस्तकात जाते, अशी टीकाही ठाकरे यांनी केली.
विधानसभेतील निवडणूक निकालाबाबत प्रत्येक राजकीय पक्षाच्या आणि मतदाराच्या मनात शंका आहे. मतदार याद्या, दुबार मतदार याबाबत २०१७ पासून ओरडून सांगतोय. इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राकडे (ईव्हीएम) दुर्लक्ष करून चालणार नाही. मतदारांनी पाच वर्षे बघितलेल्या स्वप्नांची राखरांगोळी जर ईव्हीएम मशीन करणार असेल तर निवडणुकीचा उपयोग काय, असा सवाल करीत याविरोधात महाराष्ट्राने पुढाकार घ्यायला हवा, असे म्हणत महाराष्ट्रात आग पेटलेय हे दिल्लीपर्यंत कळले पाहिजे, असे आवाहन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारच्या मोर्चानिमित्ताने मनसे पदाधिकाऱ्यांना केले.
मनसे पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरे यांनी ईव्हीएममधून होत असलेल्या मतचोरीचे प्रात्यक्षिक दाखविले. यावर बोलताना गेली १०-१२ वर्षे हे सुरू असून आपण हे ओरडून सांगतोय. महाविकास आघाडीतील घटक पक्षांकडेक रोख करताना आज जे सोबत आहेत त्यांनी त्यावेळी गांभीर्याने घेतले नाही, असे ते म्हणाले. मनसेच्या सभांना गर्दी होते, मात्र पराभव का स्वीकारावा लागतो त्यामागे हे कारण आहे. या प्रक्रियेतून सत्तेत यायचे आणि हवी तशी सत्ता राबवायची असे म्हणत त्यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली. अख्खा देश याविरोधात बोंबलतोय. मतदार याद्या स्वच्छ करा आणि निवडणुका घ्या. आणखी एक वर्ष निवडणूक झाली नाही तरी चालेल, अशी मागणी त्यांनी केली. यावेळी निवडणूक आयोगाने सीसीटीव्ही छायाचित्रण देण्यास नकार दिल्याबाबत बोलताना त्यात काय? मतदान केले जातेय यात कसला खासगीपणा आला असा सवाल करून सर्व गोष्टी लपवायचा आणि निवडणूक घ्यायची म्हणजे मॅच फिक्स आहे, अशी टीका त्यांनी केली.
मोर्चाला लोकलने जाणार
शनिवारचा मोर्चा हा दणदणीत झाला पाहिजे. महाराष्ट्रात काय आग पेटलीय हे दिल्लीला कळायला हवे. मोर्चात सहभागी होऊन महाराष्ट्राता काय राग आहे हे दाखवून द्या, असे आवाहन त्यांनी केले. मतदार उन्हात तासनतास उभे राहून मतदान करतात. मात्र महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या या मतदारांचा अपमान केला जातोय. असे सांगताना त्यांनी मतपत्रिकांवर मतदानाची मागणी केली. मोर्चात सहभागी होण्याविषयी बोलताना १ तारखेच्या मोर्चाला मी उपनगरीय रेल्वेने जाणार असल्याचे ठाकरे यांनी जाहीर केले.
