राजकारणातील योग्य टायमिंग आणि वकृत्वाच्या जोरावर सभा जिंकण्याचे कसब असलेला नेता म्हणून राज ठाकरे यांची महाराष्ट्रात ओळख आहे. आपल्या एकखांबी नेतृत्वाच्या जोरावर राज यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महाराष्ट्रात आपले महत्वाचे स्थान निर्माण करण्यातसुद्धा यश मिळवले. यापूर्वीच्या निवडणुकांमध्ये जिंकण्यापेक्षा मतविभाजन करण्याच्या उपद्रवमुल्यामुळे ‘मनसे’ने राजकारणातील आपली उपयुक्तता सिद्ध केली होती. मागील लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांत राज यांच्या व्यक्तिगत करिष्म्यामुळे शिवसेना आणि भाजप युतीला मोठ्या प्रमाणावर नुकसान सहन करावे लागले होते. महाराष्ट्रातील जनतेला एकहाती सत्ता देण्याचे आव्हान करणाऱ्या राज ठाकरे यांना नाशिक महानगरपालिकेत ‘मनसे’ची सत्ता आल्यानंतर विशेष असे काही करून न दाखवता आले नाही. त्यामुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा दावा सपशेल खोटा ठरला आहे. यंदाच्या लोकसभेतसुद्धा ‘मनसे’कडे ठोस असा कार्यक्रम आणि पात्र उमेदवारांची वानवा होती. मात्र, तरीही आपल्या राजकीय चातुर्याचा वापर करून राज यांनी लोकसभेसाठी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा जाहिर केला. मात्र, नरेंद्र मोदींच्या लाटेपुढे लोकसभेत मनसेचे पुरते पानिपत झालेले पहायला मिळाले. राज यांची बहुप्रतिक्षीत ‘ब्लु प्रिंट’ कधी जाहीर होणार याबद्दल विचारल्यावर त्यांनी नेहमीच उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे कंटाळलेल्या जनतेने विकासाचा ठोस असा अजेंडा हाती असणाऱ्या महायुतीच्या पारड्यात आपले दान टाकले. मागील लोकसभेत लाखांच्यावर मते घेणाऱ्या मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिटच जप्त झाल्याने ‘मनसे’चे पितळ पुरते उघडे पडले. याच पार्श्वभूमीवर आपली आणि पक्षाची भूमिका मांडण्यासाठी राज ठाकरे आज (शनिवारी) मुंबईत जनतेला सामोरे जात आहेत. त्यामुळे राज आजच्या सभेत नक्की काय बोलणार याविषयीच्या चर्चांना उधाण आले आहे. राज ठाकरे आज काही प्रमुख अशा मुद्द्यांवर आपली भूमिका मांडू शकतात, काय असू शकतात हे मुद्दे ?…

१. लोकसभा निवडणुकीत पराभव – दहा पैकी ८ ठिकाणी मनसेच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त, सर्व ठिकाणी उमेदवार पराभूत, मनसेचे उमेदवार तिसऱया किंवा चौथ्या क्रमांकावर फेकले गेले

२. राज्यातील टोलचा प्रश्न, मुख्यमंत्र्यांनी टोलच्या प्रश्नात लक्ष घालण्याचे ठरविल्यानंतर राज ठाकरे यांनी आंदोलन स्थगित केले. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्यापूर्वी यावर निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांनी राज ठाकरे यांना सांगितले होते. मात्र निर्णय काहीच झाला नाही. आता राज ठाकरे काय भूमिका घेणार

३. उद्धव ठाकरे पुन्हा लक्ष्य – लोकसभा निवडणुकीत राज ठाकरे यांनी शिवसेना आणि उद्धव ठाकरेंना लक्ष्य केले होते. तेलकट वडे आणि चिकन सूपचा विषय काढला होता. त्यामुळे त्यांच्यावर टीकाही झाली होती. पण लोकसभा निवडणुकीत शिवसेनेला मिळालेल्या घवघवीत यशानंतर राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना पुष्पगुच्छ पाठवला होता. आता यावर ते काय बोलतात ?

४. नाशिक हा मनसेचा बालेकिल्ला. तिथे महापालिकेत मनसेची सत्ता आहे. शिवाय तीन आमदार तिथून निवडून आले आहेत. तरीही तेथे पक्षाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. आता राज ठाकरे नाशिकबाबत काय भूमिका घेणार ?

५. राज्यातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आघाडी सरकारवर राज ठाकरे कायमच टीका करतात. आजच्या सभेतही पुन्हा राज्यातील आघाडीच्या कारभारावर राज ठाकरे प्रहार करणार का, कोणते मंत्री त्यांच्या निशाण्यावर असतील, छगन भुजबळ, अजित पवार की पृथ्वीराज चव्हाण ?

६. विधानसभा निवडणुका जवळ आल्याने राज ठाकरे कोणते नवे आंदोलन हातात घेतात काय, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचण्यासाठी ते कार्यकर्त्यांना काही कार्यक्रम देणार का, हे सुद्धा बघावे लागेल.