मुंबई : मुंबई महानगरातील कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी पुढाकार घेतलेल्या रजनीश कुमार गोयल यांनी पश्चिम रेल्वेच्या प्रधान मुख्य विद्युत अभियंता म्हणून पदभार स्वीकारला.
भारतीय रेल्वेमधील विद्युत अभियंता सेवा (आयआरएसईई)च्या १९९१ च्या बॅचचे अधिकारी रजनीश कुमार गोयल हे यापूर्वी मध्य रेल्वेचे मुख्य विद्युत सेवा अभियंता म्हणून काम करत होते. गोयल हे अत्यंत कुशल आहेत आणि त्यांना भारतीय रेल्वेवर काम करण्याच्या विविध क्षेत्रांमध्ये मोठा अनुभव आहे. भारतीय रेल्वेवर ओपन अॅक्सेसचे प्रणेते म्हणून त्यांनी त्याच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ज्यामुळे गेल्या १० वर्षांत ३०,००० कोटींहून अधिक रक्कम वाचली आहे. गोयल यांनी भारतीय रेल्वेच्या सर्वात मोठ्या आणि व्यस्त विभागांपैकी एक असलेल्या मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापकाची महत्त्वाची जबाबदारी सांभाळली आहे.
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापक म्हणून त्यांच्या कारकिर्दीत, त्यांना फलाटावरील गर्दी कमी करण्यासाठी, रुळांवरील अपघात कमी करण्यासाठी आणि रुळांवर पुराचे पाणी साचले तरीही लोकल सेवा सुरक्षित चालविण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती. तसेच रेल्वे प्रवाशांची गर्दी विभाजित करण्यासाठी कार्यालयीन वेळा बदलण्यासाठी, मुंबई महानगरातील सरकारी, निमसरकारी आणि खासगी कार्यालयाशी पत्रव्यवहार केला होता. तसेच मध्य रेल्वेच्या मुंबई विभागातील देखील कार्यालयीन वेळेत बदल केला होता. त्यांनी विद्युत अभियांत्रिकीमध्ये (ऑनर्स) पदवी पूर्ण केली. त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, दिल्ली येथून ‘पॉवर इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल मशीन्स अँड ड्राइव्ह्स’मध्ये पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे.