मुंबई : पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरणात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरतील १६९४ झोपडीधारकांना घरभाड्याच्या धनादेशाचे वाटप करण्यास झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) सुरुवात केली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मंगळवारी एका कार्यक्रमात प्रातिनिधिक स्वरुपात काही रहिवाशांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.

एमएमआरडीएकडून पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपर – ठाणे असा विस्तार करण्यात येणार आहे. या विस्तारीकरणात माता रमाबाई आंबेडकर नगरातील १६९४ झोपड्या प्रत्यक्ष बाधित होत आहे. या बाधित झोपड्यांसह रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील अंदाजे १४ हजारांहून अधिक झोपड्यांचा पुनर्विकास झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीएच्या माध्यमातून संयुक्त भागीदारीतत्वावर करण्यात येणार आहे. त्यानुसार पहिल्या टप्प्यातील पात्र झोपडीधारकांना दोन वर्षांच्या घरभाड्यापोटीच्या रक्कमेचा धनादेश वितरीत करण्यात येत आहे.

आतापर्यंत ३६३१ झोपडीधारकांना घरभाड्यापोटीच्या रक्कमेच्या धनादेशाचे वाटप करण्यात आले. आता पूर्वमूक्त मार्गात प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या १६९४ झोपड्या रिकाम्या करून घेण्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी प्रातिनिधिक स्वरुपात धनादेशाचे वाटप सुरू करण्यात आले आहे.

सर्वच्या सर्व १६९४ झोपडीधारकांना धनादेश वाटप करून त्यांची घरे रिकामी करण्याचा झोपु प्राधिकरणाचा प्रयत्न आहे. प्रत्यक्ष बाधित होणाऱ्या झोपडीधारकांना धनादेशाचे वाटप सुरू झाले असून लवकरच त्यांची घरे रिकामी करून घेण्याच्या कामाला सुरुवात होईल. घरे रिकामी झाल्यानंतर त्यांचे पाडकाम करून जागा मोकळी करण्यात येणार आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही जागा मोकळी झाल्यास पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणाच्या कामाचा मार्ग मोकळा होणार आहे. दरम्यान, आतापर्यंत मोकळी करण्यात आलेली काही एकर जमीन लवकरच झोपु प्राधिकरण एमएमआरडीएला वर्ग करणार आहे. ही जागा एमएमआरडीएकडे आल्यानंतर प्रत्यक्ष पुनर्वसित इमारतीच्या कामास सुरुवात करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. निविदा प्रक्रिया पूर्ण करून पुनर्वसित इमारतीचे काम हाती घेण्यात येणार आहे.