मुंबई : घाटकोपर, रमाबाई नगर पुनर्विकास प्रकल्पातील १२ हजार ७६० रहिवाशांचे ‘परिशिष्ट २’ अर्थात पात्रतेची अंतिम यादी सोमवारपासून प्रसिद्ध करण्यात येणार आहे. ‘परिशिष्ट २’ प्रसिद्ध झाल्यानंतर पात्र रहिवाशांबरोबर करार करण्यात येणार असून त्यानंतर त्यांची घरे रिकामी करून घेण्यास सुरुवात करण्यात येणार आहे.

रमाबाई नगरातील १६ हजार ५७५ झोपड्यांचा पुनर्विकास झोपु आणि मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) संयुक्त भागिदारी तत्त्वावर करीत आहे. पूर्वमुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात अडसर बनलेल्या एक हजार ६९४ झोपड्यांचे पहिल्या टप्प्यात प्राधान्यक्रमाने सर्वेक्षण पूर्ण करून त्यांची पात्रता निश्चिती पूर्ण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्वात आधी या झोपड्या पाडून जागा रिकामी करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वमुक्त मार्गाच्या विस्तारीकरणास सुरुवात करता येईल. त्यानुसार झोपुने १६ हजार ५७५ झोपड्यांचे सर्वेक्षण पूर्ण करून पहिल्या टप्प्यात थेट विस्थापित होणाऱ्या एक हजार ६९४ रहिवाशांपैकी एक हजार ०२९ पात्र रहिवाशांचे परिशिष्ट २ प्रसिद्ध केले आहे. या पात्र रहिवाशांबरोबर एमएमआरडीए करारनामा करीत आहे. आता उर्वरित १४ हजार २५७ रहिवाशांच्या पात्रता निश्चितीचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सोमवारपासून टप्प्याटप्प्याने परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती झोपु प्राधिकरणातील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

हेही वाचा : पात्रता यादीत नाव असल्यास झोपडी विकण्याची मुभा मिळणार! घर विकण्यासाठी मात्र पाच वर्षांचीच मुदत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रमाबाई नगरातील १४ हजार २५७ रहिवाशांच्या वीज बिल देयकाच्या पडताळणीचे काम सध्या सुरू आहे. अदानी इलेक्ट्रीसिटी कंपनीकडून जसजशी पडताळणी पूर्ण होऊन अहवाल येईल, तसतसे परिशिष्ट २ प्रसिद्ध करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले. पात्रता आणि करारनामा पूर्ण झाल्यानंतर जागा रिकामी करून एमएमआरडीएला देण्याचे नियोजन असल्याचे ही आधिकाऱ्याने सांगितले.