मुंबई : रत्नागिरीमधील मौजो सोमेश्वर येथील मांडवकर वाडी परिसरात सोमवारी आंब्याच्या बागेतील कुपणाला लावलेल्या नायलॉनच्या जाळ्यात अडकलेले दुर्मिळ खवले मांजर आढळले. स्थानिक रहिवाशांनी तातडीने वनविभागाला याबाबत माहिती दिली. वनविभागाच्या पथकाने तातडीने घटनास्थळी पोहोचून खवले मांजराची सुटका केली.

खवले मांजर अडकल्याची माहिती स्थानिकांनी तात्काळ वनविभागाला दिली. त्यानंतर वनविभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. चिखल आणि नायलॉन जाळ्यात अडकलेल्या खवले मांजराची वनविभागाच्या पथकाने सुटका केली. पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केल्यानंतर खवले मांजराची प्रकृती स्थिर असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर खवले मांजराला नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले. दरम्यान, या मोहिमेसाठी प्राणीप्रेमी रोहन वारेकर, वनपाल न्हानू गावडे, वनरक्षक शर्वरी कदम, प्राणीमित्र महेश धोत्रे यांनी सहकार्य केले असून ही कार्यवाही विभागीय वनाधिकारी रत्नागिरी (चिपळूण) गिरीजा देसाई व सहाय्यक वनसंरक्षक प्रियंका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. तसेच परित्रेक्ष वनाधिकारी प्रकाश सुतार यांचेही या मोहिमेत योगदान होते.

वन्यप्राणी अडचणीत असल्यास त्वरित संपर्क साधा

अशा प्रकारच्या घटना घडल्यास त्वरित वनविभागाच्या मदत क्रमांक १९२६ किंवा मोबाइल क्रमांक ९४२१७४१३३५ वर संपर्क साधावा, असे आवाहन वनविभागाच्या वतीने विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई यांनी केले आहे.

कोकणात खवले मांजराची तस्करी

कोकणातील दऱ्याखोऱ्यांमधील सावलीची दाट जंगले, हरित वने, निम्न हरीत शुष्क जंगल हा या प्राण्यांचा अधिवास असतो. खवले मांजराचा अधिवास या परिसरात आढळतो. दरम्यान, कोकणात तस्करीमुळे खवले मांजराचे अस्तित्व धोक्यात आले आहे. गेल्या काही वर्षात कोकणात खवले मांजर तस्करीच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. गेल्या काही वर्षात श्रीवर्धन, मुरुड, अलिबाग, महाड, खोपोली, सुधागड पाली, कर्जत, पनवेल आदी भागात मोठ्या प्रमाणावर खवले मांजरांची तस्करीची प्रकरणे समोर आली आहेत. राज्याच्या बाहेर मध्य प्रदेशमध्ये गोरखपुर व इतर पूर्व भागातून खवले मांजर नेपाळला पाठवले जातात. तिथून ते चीन, पूर्व आशियाई देशात पाठविले जातात.

संवर्धनासाठी प्रयत्न सुरू

गेल्या अनेक वर्षांपासून चिपळूणमधील सह्याद्री निसर्ग मित्र संस्थेचे अध्यक्ष भाऊ काटदरे आणि त्यांचे सहकारी खवले मांजराच्या संवर्धनासाठी पंचक्रोषीत काम करीत आहेत. रायगड परिसरामध्ये सिस्केप संस्था, वनविभाग आणि स्थानिक ग्रामस्थ यांच्या माध्यमातून काही गावांमध्ये संवर्धनाचे काम सुरू आहे. दरम्यान, खवले मांजराच्या तस्करीचे वाढते प्रमाण लक्षात घेऊन व्यापक उपाययोजना करण्याची गरज आहे. तस्करीमुळे कोकणातील खवले मांजरांचे अस्तित्व धोक्यात येत आहे, अशी खंत प्राणीप्रेमींनी व्यक्त केली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

खवले मांजर वनविभागाकडे सुपूर्द

दोन दिवसांपूर्वी माणगाव तालुक्यातील खांदाड गावात खवले मांजर आढळले होते. गावातील तरुणांनी खवले मांजर वनविभागाकडे सुपूर्द केले. काळ नदीला पूर आल्यामुळे पश्चिमेकडील जंगलातून खवले मांजर वाहून येथे आले असावे, असा अंदाज वन्यजीव अभ्यासकांनी व्यक्त केला