मुंबई : मी पुन्हा येईन हे बोललो होतो. त्यावर माझी बरीच खिल्ली उडविण्यात आली. पण मी आता आलो आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना प्रत्युत्तर, आदित्य ठाकरे यांच्या प्रश्नांवर बंडखोर शिवसेना आमदाराची उडालेली भंबेरी, आमदारांच्या अनुपस्थितीमुळे काँग्रेसमध्ये काही काळ निर्माण झालेले संशयाचे वातावरण यांनी सभागृहात व सभागृहाबाहेर रंगत आणली.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात देवेंद्र फडणवीस हे मी पुन्हा येईन.. ही कविता सर्वत्र ऐकविली होती. पण पुन्हा सत्तेत न आल्याने विरोधक फडणवीस यांची टिंगलटवाळी करीत.

 मी पुन्हा येईन बोललो तेव्हा माझी टिंगल करण्यात आली होती. पण मी आता आलो आहे व तेसुद्धा एकनाथ शिंदे यांना बरोबर घेऊन. माझी टिंगल उडवली त्यांचा बदला घेणार तो साऱ्यांना माफ करून, असे फडणवीस यांनी सांगताच सारेच हास्यात बुडाले.

शिवसेना व बंडखोर आमदारांमध्ये सध्या कायदेशीर लढाई सुरू झाली आहे. माजी मंत्री आदित्य ठाकरे हे विधान भवनात येत असताना समोर बंडखोर आमदार प्रकाश सुर्वे दिसले. मग दोघांनी हस्तांदोलन केले. ‘तुम्ही एवढे जवळचे असून असे केलेत . मतदारसंघात काय सांगणार आता. तुमच्याकडून अशी अपेक्षा नव्हती. त्या दिवशी जेवायला येणार होतात ना. तयारी केली होती. ठिक आहे बघा पुन्हा विचार करा. तुम्ही तेथे गेल्याने मला दु:ख झाले’ असे आदित्य यांनी एकापाठोपाठ प्रश्नांची सरबत्ती केली असता प्रकाश सुर्वे निरुत्तर झाले. त्यांची भंबेरी उडाली होती.

आनंद दिघे यांचा वारंवार उल्लेख

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विधानसभेत आनंद दिघे यांचा अनेकदा उल्लेख झाला. मुख्यमंत्री शिंदे यांनी भाषणात वारंवार दिघे यांचा उल्लेख केला. शिंदे गटाचे गुलाबराव पाटील यांनी दिघे किती महान होते हे सांगताना उद्धव ठाकरे यांच्यावर कुरघोडी केली. दिघे यांच्या नावाचा सातत्याने उल्लेख झाल्याने राष्ट्रवादी व काँग्रेसचे आमदार कोण हे दिघे  हा प्रश्न करीत होते.