चंद्रपूर जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी वन विभागातील ‘घोडाझरी’ या नवीन अभयारण्याच्या निर्मितीला बुधवारी झालेल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृहात ही बैठक पार पडली.
ब्रम्हपुरी वन विभागातील एकूण १५९.५८३२ चौकिमी क्षेत्र घोडाझरी अभयारण्यात समाविष्ट होणार असून या क्षेत्रामध्ये वन विभागातील नागभीड, तळोधी व चिमूर वन परिक्षेत्रातील पहाडी जमिनीचे व घोडाझरी तलावालगतचे वनक्षेत्र आहे. या क्षेत्रामध्ये सात बहिणी पहाड, मुक्ताई देवस्थान-धबधबा असून प्रस्तावित अभयारण्याच्या पूर्व भागास नागपूर ते चंद्रपूर रोड आहे. या वनक्षेत्रात पहाडी भाग मोठ्या प्रमाणात असून वन्यजीवांच्या अधिवासासाठी हा भाग अतिशय उपयुक्त आहे. या वनक्षेत्रात १० ते १५ वाघ, २३ बिबटे यांसह रानगवा, चितळ, सांबर, नीलगाय, कोल्हे, रानडुक्कर, माकड आणि ससे यासारखे वन्यजीवांचे वास्तव्य आहे. या अभयारण्याच्या निर्मितीमुळे आजुबाजूच्या ५९ गावांमध्ये रोजगार निर्मिती होणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.
आजच्या बैठकीत राष्ट्रीय उद्यान, अभयारण्य क्षेत्रातील तसेच या क्षेत्राबाहेरील विकास कामांना अटींच्या अधीन राहून तसेच करावयाच्या उपाययोजनांची दखल घेत ही मंजुरी देण्यात आली आहे. भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण यांच्याकडून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवलीच्या सीमेवरून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ८ चे रुंदीकरण आणि मजबुतीकरण करण्याच्या प्रस्तावाचाही यात समावेश आहे. याचप्रमाणे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांचा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातून जाणारा टिकुजीनीवाडी ठाणे याला बोरिवली, मुंबई येथे जोडणाऱ्या प्रस्तावित महामार्गासाठी बोगद्यांचे सर्वेक्षण करण्यासही आज मान्यता देण्यात आली.
संरक्षित क्षेत्राच्या बाहेरील प्रस्तावित विकास कामांच्या प्रस्तावामध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ यांच्या नागपूर ते मुंबई सुपर एक्सप्रेस वे च्या पॅकेज-५, ठाणे जिल्ह्याबाबतच्या प्रस्तावाचा ही समावेश होता. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले, मुंबई नागपूर एक्सप्रेस वे हा पूर्ण महामार्ग जागतिक दर्जाचा करण्यात येत असून तो ‘कार्बन न्युट्रल’ करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील. त्यामुळे हे काम करत असतांना वन्यजीव संरक्षणाच्या सर्व उपाययोजनांचा विचार करूनच हे काम केले जाणार आहे. या बैठकीत तेजस ठाकरे यांना संशोधनाच्या कामासाठी गोड्या पाण्यातील खेकड्यांचे जिवंत नमुने गोळा करण्यासाठी परवानगी देण्यात आली.