लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

मुंबई : काळा चौकी येथील अभ्युदय नगर वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत करण्याच्या महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) प्रस्तावाला राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे. अभ्युदय नगरसह आदर्श नगर (वरळी) आणि वांद्रे रेक्लमेशन वसाहतीचा पुनर्विकास करण्याचा एकत्रित प्रस्ताव म्हाडाने सादर केला होता. मात्र त्याऐवजी फक्त अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासाला मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित दोन्ही वसाहतींच्या पुनर्विकासाबाबत नंतर निर्णय घेतला जाणार आहे.

गोरेगाव येथील मोतीलाल नगर वसाहतीचा पुनर्विकास ‘कन्स्ट्रक्शन आणि डेव्हलपमेंट एजन्सी’मार्फत करण्यास मान्यता मिळाली होती. या प्रकरणी म्हाडाने निविदा जारी केली होती. अदानी आणि एल ॲंड टी या दोन बड्या विकासकांच्या निविदा अंतिम शर्यतीत आहेत. परंतु न्यायालयात प्रकरण प्रलंबित असल्यामुळे पुनर्विकास पुढे सरकू शकलेला नाही. अशात आता अभ्युदय नगर वसाहतीच्या पुनर्विकासासाठी मंजुरी देण्यात आली आहे. अभ्युदय नगर वसाहतीत आता एकल पुनर्विकासावर प्रतिबंध येणार आहे. गेल्या आठवड्यात काळा चौकी येथील एका सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभ्युदय नगर वसाहतीचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणला जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे आणून त्यापैकी फक्त अभ्युदयनगर पुनर्विकासास मंजुरी देण्यात आली आहे.

आणखी वाचा-भेसळयुक्त खाद्यपदार्थांचे विश्लेषण वेगात होणार, १४ दिवसांमध्ये मिळणार अहवाल

विकास नियंत्रण नियमावलीतील ३३(५) अन्वये या वसाहतीचा पुनर्विकास होणार आहे. हा परिसर चार हजार चौरस मीटरपेक्षा अधिक असल्यामुळे चार इतके चटईक्षेत्रफळ लागू होणार आहे. यापैकी एक चटईक्षेत्रफळाइतका घरांचा साठा निवड झालेल्या विकासकाला द्यावा लागणार आहे. कन्स्ट्रक्शन अँड डेव्हलमेंट एजन्सी या पद्धतीनुसार निविदा मागवून सर्वाधिक घरांचा साठा किंवा अधिमूल्य देणाऱ्या विकासकाची निवड केली जाणार आहे. या विकासकाने रहिवाशांना पर्यायी भाडे आणि कॉर्पस निधी द्यावयाचा आहे. हा प्रकल्प वेळेत पूर्ण व्हावा आणि यावर संनियंत्रण राहावे यासाठी गृहनिर्माण विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत म्हाडाचे उपाध्यक्ष, महापालिकेचे संबंधित अतिरिक्त आयुक्त, उपसचिव, मुंबई गृहनिर्माण मंडळाचे मुख्य अधिकारी यांचा समावेश असून या समितीने शिफारशी सादर करावयाच्या आहेत. याशिवाय चार महिन्यांतून एकदा या प्रकल्पाचा आढावाही या समितीने घ्यावयाचा आहे.

अभ्युदय नगरसह वांद्रे रेक्लमेशन आणि आदर्श नगर पुनर्विकासात म्हाडाला ३३ हजार घरे अपेक्षित आहेत. आता फक्त अभ्युदय नगरच्या पुनर्विकासाला परवानगी मिळाली आहे. ३३ एकरवरील पसरलेल्या या भूखंडावर ४९ इमारती असून ३३५० रहिवाशी राहतात. या पुनर्विकासातून दहा हजारहून अधिक घरे म्हाडाला सोडतीसाठी मिळणार आहेत.