मुंबई…घाटकोपरमधील माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराजनगर पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत पहिल्या टप्प्यातील झोपड्या रिकाम्या करण्याचे काम अखेर झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाकडून पूर्ण करण्यात आले आहे. एकूण ७६ एकरपैकी १७ एकर जमीन पहिल्या टप्प्यांत रिकामी करण्यात आली आहे. पाऊणे चार हजार झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. रिकामी करण्यात आलेली जागा येत्या १०-१२ दिवसात मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) वर्ग करण्याचे नियोजन झोपु प्राधिकरणाचे आहे.
११ रहिवाशांची पात्रता निश्चिती पूर्ण
एमएमआरडीएकडून पूर्वमुक्त मार्गाचा घाटकोपर ते ठाणे असा विस्तार केला जात आहे. पूर्वमुक्त मार्गाच्या या विस्तारीकरणाच्या कामात घाटकोपर येथील माता रमाबाई आंबेडकर नगरमधील १६९४ झोपड्या बाधित होणार आहेत. त्यामुळे या झोपड्यांच्या पुनर्वसनाचा आणि भूसंपादनाचा प्रश्न गंभीर झाला होता. त्यावर पर्याय म्हणून शेवटी एमएमआरडीएने संपूर्ण रमाबाई नगर आणि कामराज नगरचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार झोपु प्राधिकरण आणि एमएमआरडीए यांच्याकडून संयुक्त भागीदारी तत्वावर १४ हजार झोपड्यांचा पुनर्विकास केला जात आहे.
झोपु प्राधिकरणाकडे पात्रता निश्चिती आणि झोपड्या रिकाम्या करून मोकळी जागा एमएमआरडीएकडे हस्तांतरीत करण्याची जबाबदारी आहे. त्यानुसार झोपु प्राधिकरणाने अंदाजे ११ हजार रहिवाशांची पात्रता निश्चिती केली असून उर्वरित रहिवाशांच्या पात्रता निश्चितीची प्रक्रिया सुरु आहे. दुसरीकडे पहिल्या टप्प्यात एन-१९ क्षेत्रातील ४०५४ झोपड्यांपैकी अंदाजे ३७५० झोपड्या रिकाम्या केल्या आहेत.
पहिल्या टप्प्यात एक उद्यान प्रस्तावित असून तेथील अंदाजे २५० झोपड्या न हटविता ज्या झोपड्या रिकाम्या झाल्या आहेत, त्या काही झोपडीधारकांना तात्पुरती संक्रमण शिबिरातील गाळे म्हणून वापरण्यास दिल्याची माहिती झोपु प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे. उद्यानाचे बांधकाम करताना या झोपड्या हटवित जागा रिकामी केली जाणार आहे.
दुसऱ्या टप्प्यात १६९४ झोपड्या हटविणार
रमाबाई आंबेडकर नगर आणि कामराज नगरमधील १४ हजार ४५४ झोपड्या एकूण ७६ एकरवर वसलेल्या आहेत. त्यानुसार टप्प्याटप्प्यात ७६ एकर जागेवरील झोपड्या हटवित जागा रिकामी करुन एमएमआरडीएकडे वर्ग केली जाणार आहे. आतापर्यंत पहिल्या टप्प्यात १७ एकर जागा रिकामी करण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. येत्या १०-१२ दिवसांत ही जागा एमएमआरडीएकडे वर्ग केली जाईल. त्यानंतर पुढील कार्यवाही एमएमआरडीएकडून केली जाईल असेही अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान पहिल्या टप्प्यातील झोपड्या यशस्वीपणे हटविण्यात आल्यानंतर आता झोपु प्राधिकरणाकडून दुसर्या टप्प्यातील झोपड्या हटवून जागा रिकामी करुन घेण्याचे काम सुरु करण्यात येणार आहे. येत्या १०-१५ दिवसात दुसऱ्या टप्प्यातील झोपड्या हटविण्याच्या कामाला सुरुवात होईल. या टप्प्यात पूर्वमूक्त मार्गात थेट बाधित होणार्या १६९४ झोपड्या हटविण्यात येणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले. प्रकल्पात थेट बाधित होणाऱ्या झोपड्यांची जागा रिकामी करुन दिल्यास पूर्वमूक्त मार्गाच्या विस्तारीकरण प्रकल्प वेगाने मार्गी लागण्यास मदत होणार आहे.