मुंबई : म्हाडा सोडतीसाठीच्या नोंदणीस गुरुवारपासून सुरुवात करण्यात येणार आहे. पुणे मंडळाच्या आगरकर नगर येथील म्हाडा भवनात दुपारी १२ वाजता एका कार्यक्रमात मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील यांच्या हस्ते नोंदणी प्रक्रियेस सुरुवात करण्यात येणार आहे. त्याच वेळी पुणे मंडळाच्या ५,९६६ घरांच्या सोडतीच्या प्रक्रियेलाही सुरुवात करण्यात येणार आहे.

गेल्या वर्षभरात म्हाडाच्या मुंबई, कोकण, पुणे आणि औरंगबाद मंडळाच्या घरांच्या सोडतीची नागरिकांना प्रतीक्षा होती. मात्र म्हाडा सोडत प्रक्रियेत बदल केल्याने आणि याअनुषंगाने नवीन संगणकीय प्रणाली तयार करण्यात येत असल्याने सर्वच मंडळाची सोडत रखडली होती. मात्र आता नवीन संगणकीय प्रणालीची चाचणी यशस्वी झाली असून नवीन प्रक्रियेला मंजूर मिळाल्याने गुरुवारपासून एकच नोंदणी सेवा सुरू होत आहे. तर पुणे मंडळाच्या सोडतीलाही सुरुवात होत आहे.

हेही वाचा >>> मुंबई : नव्या सोडत प्रक्रियेसाठी म्हाडा मदत कक्ष सुरू करणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही नोंदणी प्रक्रिया कायमस्वरूपी असून नागरिकांना कधीही नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे आता एकामोगोमाग एक मंडळांच्या घरांच्या सोडती मार्गी लावण्यात येणार आहेत. पुणे मंडळाच्या सोडतीसाठीच्या नोंदणीला आणि अर्ज भरण्याच्या प्रक्रियेला गुरूवारपासून सुरुवात होणार आहे. असे असले तरी नोंदणी प्रक्रिया ही सर्वांसाठी असणार आहे. भविष्यातील मुंबई, कोकण, नाशिक वा इतर कोणत्याही मंडळांच्या सोडतीसाठी इच्छुकांना नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे आता आवश्यक ती कागदपत्रे जमा करून नोंदणी करावी, असे आवाहन म्हाडाच्या अधिकाऱ्यांनी नागरिकांना केले आहे.