मुंबई : सागरी किनारा मार्गालगतच्या भराव भूमीवर हिरवळ तयार करण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशन या कंपनीला देण्यात आले आहे. कंपनीच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनीच स्वतः ही माहिती समाज माध्यमांवरून दिली आहे. सागरी किनारा मार्गालगतच्या १३० एकर जागेवर ही हिरवळ तयार करण्यात येणार असून पाच कंपन्या या कामासाठी इच्छुक होत्या.
सागरी किनारा मार्ग, प्रिन्सेस स्ट्रीट उड्डाणपूल ते वांद्रे – वरळी सागरीसेतूच्या वरळी टोकापर्यंत असा १०.५८ किलोमीटर लांबीचा आहे. या प्रकल्पातील रस्त्याचे काम पूर्ण झाले असून हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू झाला आहे. आता प्रकल्पा लगतच्या जागेवर हिरवळ तयार करण्याच्या कामासाठी पालिकेने तयारी सुरू केली आहे. महापालिकेला या प्रकल्पासाठी ४०० कोटी रुपयांपर्यंत खर्च येणार आहे. हा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून करण्याऐवजी सीएसआर निधीतून केल्यास पैशांची बचत होईल. त्यामुळे हरित क्षेत्राचा विकास सीएसआर निधीतून करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला होता. त्यानुसार या कामासाठी विविध कंपन्यांकडून अर्ज मागवण्यात आले होते. तब्बल १३० एकर जागेवर हिरवळ तयार करण्याचे काम रिलायन्स फाऊंडेशनला देण्याचे ठरले आहे.
या कामासाठी पालिका प्रशासनाने मोठमोठ्या कंपन्यांकडून अर्ज मागवले होते. त्याला पाच मोठ्या कंपन्यांनी प्रतिसाद दिला होता. रिलायन्स, जिंदाल, स्टरलाईट, टोरेंण्ट पॉवर, रेमण्डस अशा पाच कंपन्या या कामासाठी पुढे आल्या होत्या. कंपन्यांच्या सीएसआर निधीतून हे हरितक्षेत्र तयार करण्यात येणार असून त्यासाठी पालिका प्रशासनाने ४०० कोटी रुपयांची भांडवली गुंतवणूक करण्याची क्षमता असलेल्या कंपन्यांकडून अर्ज मागवले होते. पुढे आलेल्या कंपन्यांनी थोड्या भागाच्या देखभालीची तयारी दर्शवली होती. मात्र संपूर्ण काम एकाच कंपनीला देण्याचा पालिकेचा विचार होता. त्यातून रिलायन्स कंपनीची निवड झाली आहे. हिरवळ तयार केल्यानंतर पुढील ३० वर्षे देखभालही करावी लागणार आहे.
सागरी किनारा मार्ग प्रकल्पासाठी समुद्रात भराव टाकून जमिन तयार करण्यात आली आहे. भराव टाकल्यामुळे १ कोटी ३ लाख ८३ हजार ८२० चौरस फुटांचे भराव क्षेत्र उपलब्ध होणार आहे. यापैकी सुमारे २५ ते ३० टक्के क्षेत्रात सागरी किनारा रस्त्याचे बांधकाम करण्यात आले आहे. तर उर्वरित ७० ते ७५ टक्के जागेत म्हणजेच ५३ हेक्टर जागेत हरीत क्षेत्र व नागरी सुविधा उभारण्यात येणार आहेत. या हरीतक्षेत्राचा विकास आता रिलायन्स कंपनी करणार आहे.
माझ्यासाठी अत्यंत खास प्रकल्प …
नीता अंबानी सागरी किनारा मार्गालगत हिरवळ तयार करण्याचे काम रिलायन्स कंपनीकडे दिल्याची माहिती स्वतः नीता अंबानी यांनीच समाज माध्यमांवरून दिली आहे. हा प्रकल्प आपल्यासाठी अत्यंंत खास असल्याचे मतही त्यांनी समाजमाध्यमांवरून व्यक्त केला आहे. या शहराने मुंबईकरांना भरभरून दिले आहे. आता या शहराला आपण काहीतरी देण्याची वेळ आली आहे. हा प्रकल्प म्हणजे विकास आणि पर्यावरण यांच्यातील समतोल असेल. तसेच विकास आणि निसर्गाचे जतन यांच्यात ताळमेळ राखण्यासाठीही हा प्रकल्प महत्त्वाचा असेल असेही त्यांनी सांगितले. या ठिकाणी मुंबईकरांना मोकळा श्वास, शुद्ध हवा घेता येईल आणि सूर्योदय व सूर्यास्तही अनुभवता येईल, असेही नीता अंबानी यांनी म्हटले आहे.