मुंबई : उन्हाळ्याच्या सुट्टीत मोठ्या संख्येने नागरिक बाहेरगावी जाण्यासाठी रेल्वे प्रवासाला प्राधान्य देतात. त्यामुळे रेल्वेमध्ये गर्दी वाढते. परिणामी, रेल्वे प्रशासन नियमित गाड्यांसोबत विशेष रेल्वेगाड्या चालवित आहे. परंतु, विशेष रेल्वेगाड्यांची सेवा मर्यादित तारखेपर्यंत असून त्यानंतर प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन प्रवाशांसाठी आणि अतिरिक्त गर्दी विभाजित करण्यासाठी राज्यातंर्गत विशेष रेल्वेगाडीचा कालावधी जूनपर्यंत वाढविण्यात आला आहे. मध्य रेल्वेच्या या निर्णयाने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.

मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन विशेष गाड्यांच्या सेवांचा कालावधी वाढविण्यात आला आहे. गाडी क्रमांक ०१४३५ सोलापूर – लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी २९ एप्रिलपर्यंत चालवण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. आता या रेल्वेगाडीचा कालावधी ६ मेपासून २४ जूनपर्यंत वाढवण्यात आला आहे. तर, गाडी क्रमांक ०१४३६ लोकमान्य टिळक टर्मिनस – सोलापूर साप्ताहिक विशेष रेल्वेगाडी ३० एप्रिलपर्यंत धावणार होती. आता ही रेल्वेगाडी ७ मे ते २५ जूनदरम्यान धावणार आहे.

गाडी क्रमांक ०१४६१ सोलापूर – दौंड जंक्शन आणि गाडी क्रमांक ०१४६२ दौंड जंक्शन – सोलापूर अनारक्षित दैनिक विशेष रेल्वेगाडी ३० एप्रिलपर्यंत धावणार होती. ती आता १ मे ते ३० जूनदरम्यान धावणार आहे.

गाडी क्रमांक ०१०२४ छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) – पुणे आणि गाडी क्रमांक ०१०२३ पुणे – छत्रपती शाहू महाराज टर्मिनस (कोल्हापूर) विशेष रेल्वेगाडी ३० एप्रिलपर्यंत धावणार होती. आता ही रेल्वेगाडी १ मे ते ३० जूनदरम्यान धावणार आहे.

गाडी क्रमांक ०१२११ बडनेरा जंक्शन – नाशिक रोड आणि गाडी क्रमांक ०१२१२ नाशिक रोड – बडनेरा जंक्शन अनारक्षित दैनिक विशेष रेल्वेगाडी ३० एप्रिल २०२५ पर्यंत चालवण्यात येण्याच्या सूचना होत्या. आता ती १ मे ते ३० जूनदरम्यान धावणार आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

गाडी क्रमांक ०१४८७ पुणे – हरंगुळ आणि गाडी क्रमांक ०१४८८ हरंगुळ – पुणे विशेष रेल्वेगाडी ३० एप्रिलपर्यंत चालविण्यात येणार होती. आता या रेल्वेगाड्या १ मे ते ३० जूनदरम्यान धावणार आहेत. या रेल्वेगाड्याचे आरक्षण विशेष शुल्कासह ३० एप्रिल रोजीपासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि आयआरसीटीसी संकेतस्थळावर सुरू झाले आहे. या विशेष रेल्वेगाड्यांच्या थांब्यांचा तपशील भारतीय रेल्वेच्या संकेतस्थळावर किंवा एनटीईएस ॲपवर पाहता येतील, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाने दिली.