मुंबईवरील दहशतवादी हल्ल्याला सहा वर्षे पूर्ण झाल्याची आठवण २६/११च्या निमित्ताने ताजी झाली आणि मुंबईकरांच्या जखमेवरील खपली निघून आत खोलवर झालेली जखम पुन्हा भळभळली. या हल्ल्यात अतिरेक्यांचा सामना करताना शहीद झालेल्या सुरक्षा दलातील जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी मंत्र्यांपासून सामान्य मुंबईकर पुढे सरसावले. सरकारी इतमामातील कार्यक्रम मुंबई पोलीस जिमखाना येथील स्मृतिस्थळावर पार पडला. तर मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस, कामा रुग्णालय, विविध सार्वजनिक ठिकाणे येथे नागरीक व पोलीस यांनी एकत्र येत या शहिदांची आठवण जागवली.
पोलीस जिमखान्यावर पार पडलेल्या कार्यक्रमात राज्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे, उद्योग, खाण आणि संसदीय कामकाजमंत्री प्रकाश मेहता, मुंबईचे पोलीस आयुक्त राकेश मारिया आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजीव दयाल यांनी पुष्पचक्रे अर्पण करत शहिदांना आदरांजली वाहिली. या वेळी या हल्ल्यात शहीद झालेल्या पोलिसांचे नातेवाईकही हजर होते. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या पुणे आणि वर्धा भेटीमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मात्र या कार्यक्रमाला हजर राहू शकले नाहीत. मात्र त्यांनी आपला संदेश पाठवला होता.या सरकारी कार्यक्रमाशिवाय मुंबई आणि ठाणे येथेही विविध ठिकाणी नागरिकांनी व पोलिसांनी एकत्र येऊन श्रद्धांजली कार्यक्रम केले. २६/११च्या हल्ल्यातील एक मुख्य केंद्र असलेल्या मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस येथे रेल्वे पोलिसांनी फलकावर श्रद्धांजली संदेश लिहिण्याचे आवाहन केल्यानंतर फलक संदेशांनी, सह्यांनी भरला होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Remembering the martyrs of 2611 attacks
First published on: 27-11-2014 at 03:32 IST