मुंबईत प्रथमच घडत असलेल्या त्या अविष्काराचे साक्षीदार होण्यासाठी प्रेक्षागार तुडुंब भरलेले, अनेक रसिक जागा मिळेल तेथे उभे, सर्वाचे श्वास रोखलेले आणि नजर रंगमंचावर खिळलेली, अशातच तबल्याच्या प्रांतातील ते दोन दिग्गज रंगमंचावर अवतीर्ण झाले आणि तो अभूतपूर्व योग पाहून रसिकांना क्षणभर टाळ्या वाजविण्याचेही भान उरले नाही. निमित्त होते विलेपाल्रे पूर्व येथील साठय़े महाविद्यालयाच्या प्रांगणात रंगलेल्या ह्रृदयेश फेस्टिव्हलह्णच्या समारोपाच्या दिवसाच्या पहिल्या सत्राचे. हा महोत्सव अविस्मरणीय करण्यासाठी रंगमंचावर दाखल झालेल्या पं. अनिंदो चटर्जी आणि पं. कुमार बोस या जगविख्यात तबलावादकांची जुगलबंदी अशी काही रंगली की रसिकांच्या श्रुती धन्य जाहल्या, डोळ्यांचेही पारणे फिटले. केवळ ही जुगलबंदी संपूर्ण महोत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरली. अनेक नामांकित गायक-वादकांचा सहभाग असलेला हा तीन दिवसीय महोत्सव लोकसत्ताह्णतर्फे प्रस्तुत करण्यात आला.

सतार, बासरी, संतूर आदी वाद्यांसोबत तबल्याची जुगलबंदी असते तेव्हा तबलावादक एका कोपऱ्यात आढळतात. सोमवारी झालेल्या या अपूर्व जुगलबंदीच्या वेळी मात्र सारंगी आणि संवादिनी ही वाद्ये दोन बाजूंना तर हे तबलावादक केंद्रस्थानी असल्याचे आगळेवेगळे दृश्य पहाण्यास मिळाले. बनारस घराण्याच्या पं. कुमार बोस यांनी गेल्या वर्षीच साठी पार केलेली तर फारुखाबाद घराण्याचे पं. अनिंदो चटर्जी हे बोस यांच्यापेक्षा केवळ एक वर्षांने लहान. मात्र, दोघांच्याही वादनात वयाचा लवलेश नव्हता. त्रिताल हा पूर्ण ताल असल्याने त्या तालात जुगलबंदी करतो, आमच्या घराण्यात या तालाची सुरुवात उठानने होत असल्याने मी सुरुवात करतो आणि नंतर अिनदो हे त्यातील पेशकार सादर करतीलह्ण, असे सांगत पं. बोस यांचा कडक हात तबल्यावर पडला आणि रसिकांना बनारस घराण्याच्या आक्रमक व दणकेबाज शैलीची प्रचिती आली. कसलेल्या पं. अिनदो यांनीही तोडीस तोड वादन करत आपल्या प्रदीर्घ साधनेची साक्ष दिली. या ज्येष्ठ वादकांनी खेळीमेळीत व आपापसात ताळमेळ राखून वादन केल्याने जुगलबंदीतील रंगत वाढली. त्रितालाचा विस्तार, आपापल्या घराण्याच्या चीजा आदींच्या सहाय्याने दोघांचे वादन एवढे खुलले व टीपेला पोहोचले की रसिकांच्या टाळ्या थांबतच नव्हत्या. तबल्यातून एवढ्या टिपेचा आवाज निर्माण होत होता की दोन गजराज परस्परांना भिडल्येत असे वाटावे. साबीर खान (सारंगी) व पं. अजय जोगळेकर (संवादिनी) यांनी लेहऱ्यावर उत्तम साथ केली. सलग दीड तास रंगलेली ही जुगलबंदी संपली तेव्हा प्रेक्षागारातील समस्त रसिकांनी या दिग्गजांना उभे राहून टाळ्यांच्या गजरात मानवंदना दिली. या महोत्सवाचा समारोप ज्येष्ठ शास्त्रीय गायक पं. जसराज यांच्या परिपक्व  गायनाने झाली. जयजयंती रागातील
‘हेजगदिशह्ण या बंदिशीद्वारे त्यांनी मफलीची सुरुवात केली, त्यानंतर दृत लयीत  माहे मोरी दरस देह्ण ही चीज ते गायले. बसंत रागातील  ‘खेलत बसंतह्ण हे लोकप्रिय भजन सादर केल्यानंतर त्यांनी माई मेरो मन मोह लियोह्ण ही बंदिश गाऊन मफलीची सांगता केली. जसराजजींना मुकुंद पेटकर-संवादिनी, श्रीधर पार्थसारथी-मृदुंग, पं. शशांक सुब्रमण्यम-बासरी, रामकुमार मिश्रा-तबला या वादकांनी यथायोग्य साथ दिली. पं. तुळशीदास बोरकर यांचा सत्कारसंगीत नाटकांच्या सुवर्णकाळाचे साक्षीदार असणारे ज्येष्ठ संवादिनीवादक पं. तुळशीदास बोरकर यांना या वेळी पं. जसराज यांच्या हस्ते ह्रृदयेश संगीत सेवाव्रती पुरस्काराह्णने  गौरविण्यात आले. एक लाख रुपये रोख आणि मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.

हा सत्कार माझ्या गुरुंचा आहे, आईने माझ्यावर हे कलासंस्कार केले, हा तिचा व नवदुग्रेचा प्रसाद आहेह्ण, असे मनोगत पं. बोरकर यांनी व्यक्त केले. व्यासपीठावर यावेळी उद्योजक दीपक घैसास, शिवसेना नेते शशिकांत पाटकर, नगरसेविका शुभदा पाटकर, ज्येष्ठ अभिनेते मोहनदास सुखठणकर, पं. जसराज व ह्रृदयेश आर्टसह्णचे प्रमुख अविनाश प्रभावळकर उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Reputed singer instrumentalist participated in hridayesh festival
First published on: 22-01-2014 at 04:28 IST