मुंबई : मुंबईत पुनर्विकासाचे वारे जोरात वाहत असले तरी विकासकांकडून पुनर्विकास करणाऱ्या रहिवाशांना कमाल ३५ ते ४० टक्के इतक्याच अतिरिक्त क्षेत्रफळावर समाधान मानावे लागत आहे. मात्र स्वयंपुनर्विकासाला संमती देणाऱ्या रहिवाशांना कमाल अडीचशे टक्क्यांपर्यंत वाढीव क्षेत्रफळ मिळाले आहे. याशिवाय कॅार्पस निधीही दणदणीत मिळाला आहे. मुंबईतील सुमारे १६०० हून अधिक इमारती स्वयंपुनर्विकासाच्या प्रक्रियेत असून राज्य शासनानेही त्यासाठी स्वतंत्र प्राधिकरण स्थापन करण्याचे ठरविले आहे.
विकासकांकडून होणाऱ्या दिरंगाईमुळे रखडलेल्या पुनर्विकासाऐवजी स्वयंपुनर्विकास हाच उत्तम पर्याय असल्याचे स्पष्ट करीत प्रसिद्ध वास्तुरचनाकार व माजी आमदार चंद्रशेखर प्रभू यांनी सर्वप्रथम पुढाकार घेतला. विकासकांची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी हाच पर्याय असून नियोजन प्राधिकरणाकडून अद्यापही स्वयंपुनर्विकासाच्या प्रस्तावांना जलद प्रतिसाद मिळत नसल्याबद्दल खंत व्यक्त केली.
स्वयंपुनर्विकासासाठी मुंबै बँकेने अर्थसहाय्य देऊ केले. बँकेकडे अनेक प्रस्ताव पडून असून निधीअभावी त्यात अडचणी असल्याचे सांगण्यात आले. मुंबै बँकेचे अध्यक्ष व विधान परिषद सदस्य प्रवीण दरेकर यांनी २०१९ मध्ये पाठपुरावा करुन स्वयंपुनर्विकासासाठी स्वतंत्र शासन निर्णय जारी करुन घेतला. परंतु आज सहा वर्षांनंतरही या शासन निर्णयातील तरतुदी प्रत्यक्षात आलेल्या नाहीत. अखेरीस राज्य शासनाने दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली. या समितीने सादर केलेल्या अहवालावर कृती योजना सादर करण्याचे आदेश गृहनिर्माण विभागाला देण्यात आले आहेत. स्वयंपुनर्विकासासाठी दहा टक्के वाढीव चटईक्षेत्रफळ ते अधिमूल्य भरणा करण्यात सवलती आदी अनेक बाबींचा त्यात समावेश आहे.
स्वयंपुनर्विकासाचे मुंबईत आतापर्यंत १५ प्रकल्प पूर्ण झाले असून त्यात सर्वाधिक क्षेत्रफळ (२५२ टक्के) आणि कॉर्पस निधी (३७ लाख) विलेपार्ले येथील नंदादीप सहकारी गृहनिर्माण संस्थेला मिळाला आहे. या रहिवाशांची मूळ सदनिका ४७५ चौरस फुटाची होती. त्यांना स्वयंपुनर्विकासात १४०० चौरस फुटाची सदनिका मिळाली आहे. यापैकी अनेक स्वयंपुनर्विकास प्रकल्पात रहिवाशांनी निधी गोळा केला आहे तर काहींनी बँकेतून कर्ज घेतले आहे. प्रकल्प व्यवस्थापन सल्लागाराच्या माध्यमातून हे प्रकल्प राबविले जात आहेत. राज्य शासनही स्वयंपुनर्विकासासाठी अनुकूल असल्यामुळे अधिकाधिक सहकारी गृहनिर्माण संस्था त्यात रस घेत असल्याचे मुंबै बँकेच्या स्वयंपुनर्विकास कक्षाचे यतीन नाईक यांनी सांगितले.
आतापर्यंत पूर्ण झालेले प्रकल्प (कंसात रहिवाशांचे विद्यमान क्षेत्रफळ चौरस फुटामध्ये) : नंदादीप, विलेपार्ले – ४७५ (१४००), नवघर पूर्वरंग, मुलुंड – ३९० (९६०), श्वेतांबरा, चारकोप- ६६७.६९ (१०४७), चित्रा, चेंबूर – ४०२ (७१०), सुमासॅम, बोरिवली – ६५० (९१६), जयाकुंज, बोरिवली – ४४२ (६४०), अजितकुमार, गोरेगाव – ६०० (७८०).
वाढीव क्षेत्रफळ टक्क्यांमध्ये: सप्तर्षी, बोरिवली – ३०, शांताप्रभा, गोरेगाव – ५३.३२, राकेश, चारकोप – ५०, अभिलाषा, चारकोप – १५३, ओरियन, चारकोप – ७७, ओम नंदादीप – ८२, समाधान, गोराई, कांदिवली पश्चिम – ६३.५०, स्वयंभू, कांदिवली पूर्व – ३५.