मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसापासून ते महात्मा गांधी यांच्या जयंतीपर्यंत म्हणजेच १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या कालावधीत महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवडा ‘ साजरा केला जाणार आहे. या सेवा पंधरवड्यानिमित्त पंतप्रधान आवास योजनेत निर्माण करण्यात आलेल्या ३० लाख घरांना मालमत्ता पत्राचे वाटप तसेच शेतातील पाणंद रस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे. त्याचप्रमाण जिल्हाधिकाऱ्यांकडून नावीन्यपूर्ण उपक्रम राबवून लोकांना विविध सेवा तातडीने उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
या पंधरवड्यात विविध लोकोपयोगी कार्यक्रम राबवले जाणार असून महसूल विभागाने विशेषतः शेतकरी आणि गरजूंसाठी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पुण्यात या राज्यव्यापी अभियानाची सुरुवात होणार आहे. या पंधरवड्यातील पहिले पाच दिवस (१७ ते २२ सप्टेंबर) शेतकऱ्यांच्या शेतातील रस्ते आणि शिव-पाणंद रस्त्यांसाठी समर्पित असतील. महसूल विभागामार्फत या रस्त्यांची मोजणी केली जाईल आणि त्यांच्यावरील अतिक्रमणे काढली जातील. या मोहिमेतील सर्वात महत्त्वाचा आणि ऐतिहासिक निर्णय म्हणजे आता शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना क्रमांक देण्यात येणार आहे.
यामुळे रस्त्यांची ओळख निश्चित होऊन भविष्यात त्यांना अधिकृत दर्जा मिळेल. त्याचप्रमाणे ज्यांनी २०११ पूर्वी सरकारी जमिनींवर घरे बांधून अतिक्रमण केले आहे, अशा लोकांसाठी २२ ते २७ सप्टेंबर या कालावधीत महसूल विभागाकडून विशेष मोहीम राबवणार आहे. या जमिनींची मोजणी करून त्यांना कायदेशीर पट्टेवाटप करण्याचे नियोजन आहे. याच काळात जमाबंदी आयुक्तांमार्फत मालमत्ता पत्रक तयार करून देण्यावरही भर दिला जाईल. अशी माहिती बावनकुळे यांनी दिली. त्याचप्रमाणे जिल्हाधिकाऱ्यांकडून २८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर या काळात स्थानिक गरजा, भौगोलिक परिस्थितीचा विचार करून विविध उपक्रम राबविण्यात येतील. महसूल विभागाच्या विविध योजनांचा लाभ नागरिकांना तातडीने उपलब्ध करून देण्याचा यामागे उद्देश असल्याचे ते म्हणाले.
५० लाख लोकांना मिळणार लाभ
हा पंधरवडा फक्त पुण्यातच नाही, तर वर्धा जिल्ह्यातील पवनार आणि नाशिक विभागामध्येही यानिमित्त विशेष कार्यक्रमांचे आयोजन केले जाणार आहे. सर्व पालकमंत्री आपापल्या जिल्ह्यात या कार्यक्रमांची सुरुवात करतील. या १५ दिवसांच्या कालावधीत किमान ५० लाख लोकांना विविध योजनांचा लाभ मिळू शकेल, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.