मुंबई : मुंबईसह संपूर्ण भारतात लहान मुलांमध्ये फुफ्फुसांच्या संसर्गाशी संबंधित आजारामध्ये चिंताजनक वाढ दिसून येत आहे. यामागील मुख्य कारण म्हणजे अत्यंत संसर्गजन्य ह्यूमन रेस्पिरेटरी सीनसीटियल व्हायरस (आरएसव्ही) जो विशेषतः दोन वर्षांखालील मुलांच्या फुप्फुसांवर परिणाम करतो. संशोधनानुसार, या वयोगटातील बहुतेक मुलांना त्यांच्या आयुष्यात किमान एकदा आरएसव्हीचा संसर्ग होत असल्याचे आढळून आले आहे.
आरएसव्हीमुळे सर्दी, खोकला, ताप आणि श्वास घेताना त्रास होतो. काही गंभीर प्रकरणांमध्ये श्वासोच्छवास कठीण होऊन रुग्णालयात दाखल होणे आणि ऑक्सिजन सपोर्टची आवश्यकता भासू शकते. २०१९ मध्ये जागतिक स्तरावर सुमारे ३३ दशलक्ष तीव्र श्वसनसंस्थेच्या संसर्गांची नोंद झाली, ज्यामुळे ३० लाखांहून अधिक रुग्ण भरती झाले. त्याच वर्षी ५ वर्षांखालील मुलांमध्ये अंदाजे २६,३०० रुग्णालयीन मृत्यू देखील नोंदवले गेले आहेत.लहान मुलांमधील श्वसनसंस्थेच्या वाढत्या संसर्गामुळे भारतात आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे राहिले असून, त्वरित उपाययोजना न केल्यास परिस्थिती गंभीर व दीर्घकालीन ठरू शकते.
भारतात लहान मुलांमध्ये श्वसनसंस्थेचे आजार चिंताजनक प्रमाणात वाढत असल्याचे तज्ज्ञांनी इशारा दिला आहे. विशेषतः न्यूमोनिया, ब्रॉन्कायटिस, दमा तसेच हंगामी विषाणूजन्य संसर्ग यांचे प्रमाण गेल्या काही वर्षांत दुपटीने वाढले आहे. यामागे वायुप्रदूषण, हवामानातील झपाट्याने होणारे बदल, कुपोषण आणि लसीकरणाबाबतचे अपुरे भान या प्रमुख कारणांना जबाबदार ठरवले जात आहे.राष्ट्रीय आरोग्य सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, भारतात पाच वर्षांखालील मुलांमध्ये मृत्यूच्या प्रमुख कारणांमध्ये श्वसनसंस्थेचे आजार अजूनही अग्रस्थानी आहेत. दरवर्षी सुमारे १.२ लाख बालमृत्यू हे केवळ न्यूमोनियामुळे होतात, असे ‘युनिसेफ’ आणि ‘डब्ल्यूएचओ’ने स्पष्ट केले आहे. ग्रामीण भागासह शहरी झोपडपट्ट्यांमधील मुलांमध्ये या आजारांचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले आहे.
दिल्ली, मुंबई, पटना, लखनौसारख्या महानगरांत धूर, धूळकण, औद्योगिक व वाहनांमधील धूर या कारणामुळे वायूमान अत्यंत धोकादायक पातळीवर पोहोचले आहे. अशा प्रदूषित हवेचा लहान मुलांच्या फुफ्फुसांच्या विकासावर थेट परिणाम होत असून, दिर्घकालीन दम्याची शक्यता वाढत आहे.सरकारी योजनांमधून न्यूमोनिया व इन्फ्लूएंझाविरोधी लस उपलब्ध असली तरी ग्रामीण भागात जागरूकतेअभावी ती अनेक मुलांना मिळत नाही. आई-वडील अनेकदा खोकला-ज्वरासारख्या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात, परिणामी आजार तीव्र रूप धारण करतो. आरोग्य केंद्रांवरील तज्ज्ञ डॉक्टर व अत्याधुनिक उपकरणांचा अभाव हीदेखील मोठी समस्या असल्याचे आरोग्य विश्लेषकांचे म्हणणे आहे.
प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुले विशेषतः आरएसव्ही, न्यूमोनिया आणि ब्रोंकिओलायटिस यांसारख्या श्वसनसंस्थेच्या संसर्गासाठी अतिशय असुरक्षित असतात. या वयोगटातील मुलांची रोगप्रतिकारक शक्ती अजून पूर्णपणे विकसित झालेली नसते, अनेकांना स्तनपानही अपूर्ण मिळते आणि लसीकरणही पूर्ण नसते. शिवाय, मुंबईसारख्या प्रदूषित महानगरांमध्ये घरात आणि बाहेर होणारे वायुप्रदूषण संसर्ग वाढवते असे ठाण्यातील प्रसिद्ध बालरोगतज्ज्ञ डॉ संदीप केळकर यांनी सांगितल.असामान्य थकवा किंवा हालचालींमध्ये घट, जलद श्वासोच्छवास, ऑक्सिजनची कमतरता, दूध वा आहार कमी होणे, लघवी कमी होणे अशी काही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा असेही डॉ केळकर म्हणाले.
मुंबईसारख्या मोठ्या शहरात वाढत्या प्रदुषणाच्या पार्श्वभूमीवर लहान मुलांमध्ये आरएसव्ही वाढताना दिसत आहे. त्याचप्रमाणे न्यूमोनिया आणि ब्रोंकिओलायटिस यांसारख्या श्वसनसंस्थेच्या संसर्गासाठी लहान मुले असुरक्षित ठरत आहेत. पाच वर्षांपर्यंतच्या मुलांची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे विकसित झालेली नसते तसेच शाळेत किंवा सार्वजनिक ठिकाणी या मुलांना संसर्ग लगेच पकडू शकतो असे मुंबईतील बालरोग संसर्गतज्ज्ञ डॉ. जाहाबिया बागवाला यांनी सांगितले. श्वसनसंस्थेच्या संसर्गामुळे मुलांच्या शारीरिक विकासाबरोबरच शैक्षणिक प्रगतीलाही फटका बसतो. यामुळे मुलांसाठी स्वच्छ हवा, स्वच्छता, योग्य आहार आणि वेळेवर वैद्यकीय उपचार याकडे पालकांनी लक्ष देणे आवश्यक असल्याचे डॉ.बागवाला म्हणाले.
या पार्श्वभूमीवर काही प्रतिबंधात्मक इंजेक्श्नन बाजारात आली आहेत. यात रेड्डीज लॅबोरेटरीज आणि सनोफी हेल्थकेअर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड यांच्या धोरणात्मक भागीदारीतून भारतात निरसिव्हमॅब नावाचे प्रीफिल्ड इंजेक्शन उपलब्ध आहे. हे औषध मोनोक्लोनल अँटीबॉडी असून ते आरएसव्ही विषाणूला थांबवण्यास मदत करते. नवजात बाळे आणि २४ महिन्यांपर्यंतच्या लहान मुलांना दिले जाणारे हे औषध आरएसव्हीच्या श्वसनसंस्थेच्या आजारांपासून संरक्षण करते. मात्र या औषधाची किंमत खूपच जास्त असल्यामुळे गोरगरीबांना हे इंजक्शन कसे परवडणार हा एक प्रश्नच असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. याशिवाय झिरसोवीर फेज तीन या औषधाच्या ट्रायल आरएसव्ही संससर्गासाठी सुरु असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.