शिंदे सरकारने ‘मेट्रो ३’ची (कुलाबा-वांद्रे-सीप्झ) कारशेड कांजूरऐवजी आरे वसाहत परिसरात उभारण्याची घोषणा केल्यानंतर वादाची ठिणगी पडली असतानाच आरेतील रस्ते सोमवारी सकाळी २४ तासांसाठी बंद करण्यात आले. त्यानंतर तात्काळ या परिसरातील रस्त्यांवरील झाडांची छाटणी सुरू करण्यात आली. ही छाटणी नेमकी कशासाठी केली जात आहे, मुंबई मेट्रो रेल काॅर्पोरेशनकडून (एमएमआरसी) कडून हे काम केले जात आहे का याबाबत कोणतीही माहिती एमएमआरसी वा पोलिसांकडून दिली जात नाही नसून आरेत प्रचंड पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. आरेत करण्यात येणाऱ्या या वृक्ष छाटणीला आरे वाचवा आंदोलकांनी विरोध दर्शविला आहे.
PHOTOS : ‘आरे’मधील झाडांची छाटणी सुरू; परिसरातील रस्ते बंद
राज्य सरकारने ‘मेट्रो ३’ची कारशेड आरेमध्ये उभारण्याचा निर्णय घेतला असून आरेतील कामावरील बंदीही उठविण्यात आली आहे. त्यानुसार आता आरे कारशेडच्या कामाला सुरूवात होईल अशी शक्यता व्यक्त होत असतानाच सोमवारी सकाळी आरेतील रस्ता बंद करण्यात आला आहे. आरेत जाणारे रस्ते बंद करून वृक्ष छाटणीस सुरुवात करण्यात आली आहे. ही वृक्ष छाटणी नेमकी कशासाठी केली जात आहे याची माहिती एमएमआरसीकडून दिली जात नसली तरी मेट्रो ३ चे डबे मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये आणण्यासाठी हे काम केले जात असल्याची चर्चा आहे. आंध्र प्रदेशमधील श्रीसिटी येथील कारखान्यातून मेट्रो गाडी मुंबईत आणण्यात येणार असून गाडीचे आठपैकी दोन डबे सहा-सात दिवसांपूर्वी श्रीसिटी येथून रस्ते मार्गे रवाना झाले आहेत. येत्या आठ-दहा दिवसांत हे डबे मुंबईत दाखल होतील. ते मरोळ-मरोशी येथील तात्पुरत्या कारशेडमध्ये नेण्यात येणार आहेत. मोठाल्या ट्रेलरवरून हे डबे आणण्यात येत आहेत. रस्त्यांवरील झाडांचा डब्यांना अडथळा निर्माण होऊ नये यासाठी वृक्ष छाटणी करण्यात येत असल्याचे समजते. मात्र, एमएमआरसीकडून याला दुजोरा देण्यात आलेला नाही.
बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले –
मरोळ आणि गोरेगाव येथून आरे परिसरात येणाऱ्या रस्त्यांवरील वाहतूक सोमवारी सकाळी बंद करण्यात आली. आरे परिसरातून धावणाऱ्या बेस्ट बसचे मार्गही वळविण्यात आले. हे रस्ते २४ तास वाहतुकीसाठी बंद करून झाडांची छाटणी करण्यास सुरुवात करण्यात आली. याविषयी माहिती देण्यास एमएमआरसीच्या अधिकाऱ्यांनी नकार दिला. पण या कामामुळे ‘आरे वाचवा’ चळवळीतील आंदोलक कमालीचे संतप्त झाले आहेत.
कामाविषयी चौकशी करण्यासाठी गेलेल्या पर्यावरणप्रेमींना हुसकावले –
“वृक्ष छाटणीच्या नावाखाली एमएमआरसी कारशेडचे काम सुरू करेल, अशी आम्हाला भीती आहे. आरेमधील कारशेडच्या जागेतील झाडांची कत्तल करण्यास सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. येथे सोमवारी सकाळपासून सुरू असलेल्या कामाविषयी चौकशी करण्यासाठी जाणाऱ्या पर्यावरणप्रेमींना हुसकावून लावण्यात येत आहे. काही पर्यावरणप्रेमींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.”, अशी माहिती पर्यावरण प्रेमी संजीव वल्सन यांनी दिली.