मुंबई: दुचाकीवरून अथवा रिक्षामधून जाताना रस्त्यावरून चालणाऱ्या पादचाऱ्याची सोनसाखळी आणि मोबाइल चोरणाऱ्या दोन टोळ्यांशी संबंधित असलेल्या पाच जणांना आंबोली आणि बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. त्यात दोन सराईत आरोपींचा समावेश असून यापूर्वी त्यांच्याविरोधात अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींच्या अटकेमुळे अनेक गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आयेशा कुरेशी ही महिला ९ नोव्हेंबर  रोजी मालाडच्या लिंक रोडवरील सोडा बॉटल हॉटेलसमोरील रस्त्यावरून जात होती. यावेळी एका रिक्षातून आलेल्या दोन अज्ञात व्यक्तींनी तिच्याकडील महागडा आयफोन हिसकावून पलायन केले. याप्रकरणी मोबाइल चोरीचा गुन्हा दाखल होताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद तावडे यांच्या पथकातील संजय सरोळकर, संतोष देसाई, भूषण भोसले, अविनाश चव्हाण, नितीन दळवी यांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. जवळपास २५ ते ३० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची पाहणी करून या पथकाने अमीन अब्दुल मोमीन खान, अब्दुल शंकरूल्ला साह आणि तबेज मोहम्मद सलीम कुरेशी यांना अटक केली. चोरलेले तीन महागडे मोबाइल या तिघांकडून पोलिसांनी जप्त केले.

हेही वाचा >>> मुंबईः तरुणीचा विनयभंग करून अश्लील चित्रीकरण प्रसारित धमकी

अमीन हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध बोरिवली, चारकोप, कांदिवली, मालवणी, समतानगर, कस्तुरबा मार्ग, तसेच अब्दुल विरोधात बोरिवली, चारकोप, कांदिवली पोलीस ठाण्यात १८ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे. दुसऱ्या घटनेत आशा राधेश्याम दुबे या सोमवारी मुलाला अंधेरीतील सेंट ब्लेस शाळेत सोडण्यासाठी गेल्या होत्या. शाळेतून घरी जात असताना दुचाकवरून आलेल्या दोघांनी तिच्या गळ्यातील सोनसाखळी चोरून पलायन केले. गस्तीवर असलेल्या पोलिसांच्या निदर्शनास हा प्रकार आला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बंडोपंत बनसोडे यांच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक अजय चव्हाण, उपनिरीक्षक रामेश्वर ठाणगे यांच्यासह अन्य पोलीस पथकाने ४० हून अधिक सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरणाची तपासणी केली आणि इंद्रीस समशूल शेख आणि शेरखान फिरोज खान या दोघांना काही तासात शिताफीने अटक केली. चौकशीत त्यांनी गुन्ह्यांची कबुली दिली. त्यांनी चोरलेली सोनसाखळी पोलिसांनी हस्तगत केली. शेरखान हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध मेघवाडी पोलीस ठाण्यात नऊ, जोगेश्वरी पोलीस ठाण्यात चार, मालवणी आणि खार पोलीस ठाण्यात प्रत्येकी तीन, वाकोला आणि आंबोली पोलीस ठाण्यात प्रत्येकी दोन अशा २३ हून अधिक गुन्ह्यांची नोंद आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery thief five accused who stole mobiles arrested mumbai print news ysh
First published on: 30-11-2022 at 17:59 IST