मुंबई : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा प्रकल्पात स्वच्छता मॉनिटर ही संकल्पना मांडल्याचा आणि शासनाने अंमलबजावणी करण्यापूर्वी स्वखर्चाने राज्यातील शाळांमध्ये प्रकल्प राबवला होता असा दावा रोहीत आर्य यांनी केला असून मूळ गुजरातमधून त्यांच्या प्रकल्पाची सुरूवात झाल्याचा दावाही आर्या यांनी केला होता. राज्यातील शाळांमध्ये राबवण्यात आलेल्या प्रकल्पाची रक्कम शासनाकडून न मिळाल्याने त्यांनी पवई येथे गुरूवारी सतरा मुलांना ओलीस ठेवले होते.
राहीत आर्य हे स्वच्छता अभियानाचे प्रचारक आणि सामाजिक कार्यकर्ते असल्याचे सांगत. त्यांनी स्वच्छता अभियानावर आधारित लेट्स चेंज नावाचा लघुपट केला होता. त्याचे गुजरातमध्ये प्रदर्शन करून २०१३ मध्ये गुजरातमध्ये त्याचे ही मोहीम त्यांनी सुरू केली. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रकल्पाची संकल्पना आवडल्याने त्यांनी गुजरातमध्ये तो राबवण्याचे आदेश दिले होते, असा दावाही रोहीत आर्य यांनी यापूर्वी वारंवार केला आहे. शालेय विद्यार्थ्यांनी स्वच्छता दूत म्हणून काम करावे अशी त्यांची संकल्पना होती.
राज्यात मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियान सुरू झाल्यानंतर रोहीत आर्य यांनी त्यांची संकल्पना राज्याच्या शिक्षण विभागासमोर ठेवली. राज्यातील शाळांमध्ये २०२२ मध्ये पीएलसी स्वच्छता मॉनिटर प्रकल्प स्वखर्चाने राबवण्यास सुरूवात केली. सुरूवातीला प्रकल्पाचा खर्च करावा आणि त्यानंतर शिक्षण विभाग त्याची रक्कम देईल, असे आश्वासन तत्कालीन शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिले होते, असा आर्य यांचा दावा आहे. या प्रकल्पामुळा राज्यातील शाळांचा परिसर स्वच्छ झाला आणि त्यानंतर प्रकल्पाची दखल घेऊन विभागाने शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्यावेळी प्रकल्पासाठी शासनाने आर्थिक सहाय्य केले होते.
या प्रकल्पासाठी विभागाने दोन कोटी रुपयांची तरतूद केली होती. मात्र, प्रत्यक्षात रक्कम मिळाली नाही अशी तक्रार करून रोहीत आर्य हे गेल्यावर्षीपासून आंदोलन करत होते. गेल्यावर्षी (२०२४) त्यांनी सुरूवातीला मे महिन्यात रक्कम मिळावी म्हणून उपोषण केले होते. त्यानंतर २९ सप्टेंबर २०२४ मध्येही दीपक केसरकर यांच्या बंगल्यासमोर आंदोलन केले होते. अधिकारी जानेवारी २०२४ पासून प्रकल्पाची रक्कम देत नसल्याची त्याची तक्रार होती. त्यानंतर केसरकर यांनी वैयक्तिक पातळीवर साधारण १५ लाख रुपये दिले होते असे आर्य यांनी गेल्यावर्षी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगितले होते.
माझी शाळा, सुंदर शाळा उपक्रमाबाबत तक्रार
माझी शाळा, सुंदर शाळा या उपक्रमाच्या निकालावर गेल्यावर्षी आर्य यांनी आक्षेप घेतला होता. त्या अभियानात राजकीय नेत्यांच्या शाळांनाच पारितोषिके देण्यात आली होती, अशी तक्रार त्यांनी केली होती.
