मुंबई : मंत्र्यांच्या बंगल्यावर केवळ कागदोपत्री कामे दाखवून ३० कोटी रुपये खर्च केल्याचे समोर आले आहे. दक्षता आणि गुणनियंत्रक मंडळाने केलेल्या चौकशीतही त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (शरद पवार )सरचिटणीस आमदार रोहित पवार यांनी केला आहे.
रोहित पवार यांनी समाज माध्यमावर चौकशी अहवाल प्रसिद्ध करून कारवाईची मागणी केला आहे. पावसाळी अधिवेशनात विधानसभेत हा प्रश्न मी उपस्थित केला होता. एकीकडे सरकारकडे पैसे नाहीत, असे सांगितले जाते आणि दुसरीकडे भिंतीना ग्रेनाइटचे कंपाऊंड केले जाते. विशेष म्हणजे मंत्र्यांच्या बंगल्यांच्या दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांची परवानगी आवश्यक असतानाही, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी घेतली नसल्याचे चौकशीतून समोर आले आहे. प्रत्यक्षात खर्च, दुरुस्ती न करता, फर्निचर न बसविताच सर्व कागदोपत्री दाखवून पैसै लाटले आहेत. या प्रकरणातील दोषी कार्यकारी अभियांत्यासह इतर अभियंत्यांवर अजूनही कारवाई झालेली नाही. तत्काळ कारवाई करा अन्यथा अधिवेशनात सरकारची धींड काढू, असा इशाराही रोहित पवार यांनी दिला आहे.
चौकशी अहवालात गैरव्यवहारावर शिक्कामोर्तब
मंत्र्याच्या बंगल्यातील दुरुस्तीच्या कामांत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून सामाजिक कार्यकर्ते वे. ल. पाटील यांनी चौकशीची मागणी केली होती. त्यांच्या आरोपांची चौकशी दक्षता व गुणनियत्रण मंडळाचे अधीक्षक अभियंता कि. प. पाटील यांनी करून अहवाल दिला आहे. काही कामे अगोदरच्या वर्षातील आहेत. महागडे फर्निचर घेतले आहे. ठरवून दिलेल्या मानंकापेक्षा खूप जास्त खर्च झाला आहे. संरक्षणक भितांना ग्रेनाईड लावण्याची गरज नसतानाही ग्रेनाईड लावले आहे. भांडार शाखेची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज आहे. तक्रारीत तथ्य आहे, असेही पाटील यांनी अहवाल म्हटले आहे.
