मुंबई : लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी आणि भाजप यांचा ‘४०० पार’चा नारा प्रत्यक्षात येऊ नये, अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचीही इच्छा होती. भाजपला अपेक्षित असलेले यश मिळू नये म्हणून संघाकडूनही प्रयत्न झाले. निवडणुकीच्या काळात संघात निरुत्साह होता, असा दावा ‘स्वराज्य भारत’चे संस्थापक व राजकीय विश्लेषक योगेंद्र यादव यांनी केला. गुरुवारी झालेल्या ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात ते बोलत होते. लोकसभा निवडणूक निकाल, भाजपची पीछेहाट, भाजप-रा.स्व. संघातील संबंध, इंडिया आघाडीचे भवितव्य, राहुल गांधी यांचे नेतृत्व अशा विविध मुद्द्यांवर योगेंद्र यादव यांनी परखड मते मांडली. निवडणूक प्रचारकाळात रा. स्व. संघाची आता गरज उरलेली नाही, हे भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचे वक्तव्य हे त्या पक्षाच्या ध्येयधोरणाचा भाग होता. नड्डा यांनी हे विधान स्वत:हून केल्याची सुतराम शक्यता नाही. गुजरातचे मुख्यमंत्री असतानाही मोदी यांनी रा. स्व. संघाला दूरच ठेवले होते. रा. स्व. संघात मोदी यांच्याबद्दल फारशी आपुलकी नव्हती. निवडणूक निकालानंतर रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी अहंकाराबद्दल केलेले विधानही बोलके आहे, याकडे यादव यांनी लक्ष वेधले. २०१० नंतर भाजपच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाल्यानेच २०१४च्या निवडणुकीत रा. स्व. संघाने ताकदीने भाजपला मदत केली होती. पण तसा उत्साह २०२४ मध्ये दिसला नाही. मोदी यांच्या काळातील उद्योग जगताशी निर्माण झालेली जवळीकही संघाला पसंत पडलेले नाही, असे मत यादव यांनी व्यक्त केले. हेही वाचा >>> १५ मच्छीमार संघटनांचा ‘वाढवण’ला पाठिंबा; बंदर समन्वय समिती बैठकीत सकारात्मक चर्चा २६ जानेवारी १९५० रोजी भारत प्रजासत्ताक झाला असला तरी भाजपला २०२४च्या निवडणुकीनंतर दुसरे प्रजासत्ताक तयार करायचे होते. २०१९ अखेरीस पहिले प्रजासत्ताक संपुष्टात आले होते. दुसरे प्रजासत्ताक प्रत्यक्षात आणण्याकरिताच ‘चारशे पार’चा नारा भाजपकडून देण्यात आला होता. सर्व यंत्रणांवर आपले वर्चस्व प्रस्थापित करायचे होते. पण भाजपचा हा डाव यशस्वी होऊ शकला नाही, असे निरीक्षण यादव यांनी नोंदविले. लोकसभेची २०२४ची निवडणूक ही निवडणूक नव्हे तर सार्वमत होते. ‘मोदी गॅरंटी’ची भाजपने मोठ्या प्रमाणावर दवंडी पिटली होती. सार्वमताची सारी तयारी आधीपासून करण्यात आली होती. जनता आमच्याबरोबर आहे, अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. पण देशातील मतदारांनी ‘मोदी गॅरंटी’च्या विरोधात कौल दिला. ‘हो’ की ‘नाही’ यावर झालेल्या सार्वमतात मतदारांनी ‘नाही’ला कौल दिला. यामुळेच भाजपचे संख्याबळ २४० वरच सीमित राहिले. ही निवडणूक अत्यंत चुरशीची झाली. या निवडणुकीवर आपला अंकुश राहील, या दृष्टीने भाजपने प्रयत्न केला. दुर्दैवाने निवडणूक आयोगापासून साऱ्याच यंत्रणांचा कारभार भाजपच्या इशाऱ्यावरून सुरू होता. मोदी निवडून येणारच अशी वातावरणनिर्मिती करण्यात आली होती. बहुतांशी प्रसारमाध्यमांमधून भाजपने आपली प्रतिमा उजळून घेतली होती. त्याचाही निवडणूक निकालावर परिणाम झाला. अन्यथा भाजपला २४०चा आकडाही गाठणे शक्य झाले नसते, असे मतही यादव यांनी व्यक्त केले.