मुंबई : राज्यात ‘ऑनलाईन ॲप’च्या माध्यमातून सट्टा, जुगाराचा सुळसुळाट झाला आहे. यामुळे तरुण पिढी उद्ध्वस्त होत असून, यातील बड्या सट्टेबाजांचा नागपुरात तळ आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, ऑनलाईन सट्टेबाजी रोखण्यासाठी कठोर कायदा करा, अशी मागणी करीत मंगळवारी सत्ताधारी सदस्यांनीच सरकारला घरचा आहेर दिला. त्यावर ऑनलाईन सट्टेबाजी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची केंद्राला विनंती करण्यात आल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी दिली.
नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांत मोठ्या प्रमाणात ऑनलाईन सट्टा सुरू असल्याबाबत भाजपचे किशोर जोरगेवार आणि आशीष देशमुख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. त्या वेळी ऑनलाईन सट्टेबाजी रोखण्यासाठी सध्या कोणताही कायदा नसल्याची कबुली गृहराज्यमंत्र्यांनी दिली. राज्यभरात विविध ॲपच्या माध्यमातून सट्टेबाजीचा सुटसुळाट आहे.
या प्रकरणात आतापर्यंत ९७ गुन्हे दाखल झाले असले तरी ही कारवाई म्हणजे हिमनगाचे टोक आहे. प्रत्येक तालुक्यात ऑनलाईन सट्टा खेळला जात असून, ‘लुडो’, ‘जंगली रमी’, ‘माय ११ सर्कल’ यासारख्या कंपन्या दूरचित्रवाणीवर जाहिरात करून तरुण पिढीला उद्ध्वस्त करीत आहेत.
दुर्देवाची बाब म्हणजे क्रिकेटपटू, सिने कलांवत याची जाहिरात करीत असतात. क्रिकेटच्या ‘आयपीएल’ हंगामातही मोठ्या प्रमाणात सट्टा चालत असून तरुण पिढी उद्ध्वस्त होत आहे. मोठ-मोठे सट्टेबाज नागपुरात तळ ठोकून असतात. ‘आयपीएल’नंतर तरुणांच्या आत्महत्या वाढत असतात. याच्या मुळाशी गेले तर सट्टेबाजीत हरल्यामुळे तरुण आत्महत्या करीत असल्याची अनेक उदाहरणे समोर आल्याचा दावा करीत सट्टेबाजी रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची मागणी जोरगेवार व अन्य सदस्यांनी केली.
कठोर कायदा नसल्याची कबुली
गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनीही सट्टेबाजांवर कारवाईसाठी कठोर कायदा नसल्याची कबुली दिली. ऑनलाईन सट्टेबाजी प्रकरणात गेल्या दोन वर्षांत राज्यभरात ९७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये मुंबईत सर्वाधिक ३८ तर नागपूर आणि चंद्रपुरात प्रत्येकी ११, यवतमाळमध्ये ९ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. ऑनलाईन गेम बंद करण्याबाबत कोणत्याही प्रकारचे विशेष कायदे नाहीत. त्यामुळे ऑनलाईन लाॅटरी आणि सट्टेबाजीवर अंकूश आणण्यासाठी कठोर कायदा करण्याची विनंती केंद्राला करण्यात आल्याची माहिती भोयर यांनी दिली.