मुंबई: ‘मी जिवंत असून ठणठणीत आहे. माझ्या मृत्यूची अफवा पसरवू नका’, असे आवाहन चरित्र अभिनेते रजा मुराद यांनी केले आहे. गेल्या दोन दिवसांपासून समाज माध्यमावर त्यांच्या मृत्यूची अफवा पसरली आहे. या अफवांमुळे त्रस्त झालेल्या रझा मुराद यांनी अखेर अंधेरीच्या अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.

अभिनेता रजा मुराद (७४) हे हिंदी चित्रपटात चरित्र अभिनेते म्हणून काम करतात. ते अंधेरी पश्चिम येथील न्यू लिंक रोडवरील ओबेरॉय कॉम्प्लेक्समध्ये वास्तव्यास आहेत. त्यांना फेसबुकर २१ ऑगस्ट रोजी त्यांच्या मृत्यूची पोस्ट दिसली. झैनब खान नावाच्या पोस्टकर्त्यानी ती पोस्ट टाकली होती. त्यानंतर रजा मुराद यांच्या मृत्यूची अफवा वेगाने पसरू लागली.

याबाबत बोलताना रजा मुराद यांनी म्हणाले की, कुणी तरी समाज माध्यमावर माझा मृत्यू झाल्याची खोटी पोस्ट टाकली होती. त्या पोस्टमध्ये त्यांच्या जन्मतारखेपासून मृत्यूच्या तारखेपर्यंत सर्व तपशील देऊन श्रद्धांजली वाहण्यात आली होती. काही नागरिकांना माझे अस्तित्वच खटकत असावे. त्यांनी माझ्या मृत्यूबद्दल पोस्ट केली, शोक संदेश लिहिले, असे ते म्हणाले. या पोस्टकर्त्याने तर माझ्या मृत्यूची खोटी माहिती देताना माझी कुणी आठवण काढत नाही, असेही लिहिले होते. हे खूप गंभीर प्रकरण असल्याचे मुराद यांनी सांगितले.

मी जिवंत आणि ठणठणीत

या अफवेमुळे रझा मुराद यांना खूप त्रास होत आहे. लोकांना मी जिवंत आहे हे सांगता सांगता माझा घसा कोरडा पडला आहे. ही खोटी बातमी सर्वत्र पसरली आहे. मला जगभरातून फोन आणि संदेश येत आहेत. अनेक जण मला ती पोस्ट फॉरवर्ड करीत आहेत. पण मी जिवंत आणि ठणठणीत आहे, या अफवेवर विश्वास ठेवू नका, असे त्यांनी सांगितले.

अंबोली पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा

या त्रासाला कंटाळून मुराद यांनी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या प्रकरणी अंबोली पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम ३५३ (१) आणि ३५६ (२) अंतर्गत अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. अनेक जिवंत कलाकारांबाबत अशी अफवा पसरवली जाते. त्यामुळे अशी अफवा पसरविणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी मुराद यांनी केली.