अपघातानंतर अभिनेता सलमान खानच्या गाडीची तपासणी करणारा आरटीओ अधिकारी माहिती लपवत असल्याचा आरोप सलमानच्या वतीने सोमवारी करण्यात आला. मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे गाडी चालवून पदपथावर झोपलेल्यांना चिरडून एकाच्या मृत्यूस व चौघांच्या गंभीर दुखापतीस कारणीभूत असल्याच्या आरोपप्रकरणी सलमानवर सध्या खटला चालविण्यात येत आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीच्या वेळेस विभागीय परिवहन अधिकारी आर. एस. केतकर यांची साक्ष नोंदविण्यात आली. त्या वेळेस उलटतपासणीदरम्यान त्यांनी एखादा अपघात झाला असेल तर तर गाडीची आरटीओ अधिकाऱ्याकरवी तपासणी करण्यात येत असल्याचे आणि त्याबाबतचा अर्ज भरणेही अनिवार्य असल्याचे सांगितले. तसेच अपघातासाठीच्या कारणांपैकी गाडीचे टायरसुद्धा एक कारण असू शकते, असेही न्यायालयाला सांगितले. मात्र सलमानच्या गाडीच्या तपासणीच्या अहवालात टायरविषयीची माहिती नाही, ही बाब सलमानच्या वकिलांनी निदर्शनास आणून दिल्यावर अर्ज भरताना आपण टायरविषयी नमूद केले होते की नाही हे आठवत नसल्याचा दावा केतकर यांनी केला. त्यावर याबाबतची माहिती लपवत असल्याचा आरोप सलमानच्या वकिलांकडून करण्यात आला.
दरम्यान, सलमान विरोधातील खटल्याचे काम पाहणाऱ्या महानगरदंडाधिकाऱ्यांना साक्षीसाठी पाचारण करण्याची मागणी करणारा अर्ज सरकारी पक्षाने सोमवारी न्यायालयात केला, तर अपघातानंतर वैद्यकीय चाचणीदरम्यान सलमानच्या रक्ताचे नमुने घेणारा जे जे रुग्णालयातील डॉक्टर सापडला असून बहुधा पुढील सुनावणीच्या वेळेस त्याची साक्ष नोंदविण्यात येण्याची शक्यता आहे.
संग्रहित लेख, दिनांक 16th Dec 2014 रोजी प्रकाशित
आरटीओ अधिकारी माहिती लपवत असल्याचा सलमानचा आरोप
अपघातानंतर अभिनेता सलमान खानच्या गाडीची तपासणी करणारा आरटीओ अधिकारी माहिती लपवत असल्याचा आरोप सलमानच्या वतीने सोमवारी करण्यात आला.

First published on: 16-12-2014 at 12:15 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Salman khan making allegation on rto officials for hiding information