नमिता धुरी

महिनाभर व्यवसाय बंद राहिल्याने उपासमारीची वेळ; कमाई नसल्याने दुकानांचे भाडे, कर्मचाऱ्यांचे पगार थकले

करोनामुळे लागू टाळेबंदीत डोक्याचे, दाढीचे केस वाढल्यावरून सुरू झालेले विनोद करमणुकीचा विषय ठरत असले, तरी केशकर्तनाचे काम करणारे सलून, पार्लर, केशकर्तनालये येथे काम करणाऱ्या कारागिरांच्या वेदनेची किनार हा विषय गंभीर बनवू लागला आहे. गेल्या महिनाभरापासून ही सर्व दुकाने बंद असल्याने तेथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे उदरनिर्वाहाचे साधनच बंद झाले आहे. दुसरीकडे, दुकानांचे भाडे किंवा कारागिरांचे पगार थकू लागल्याने ही संपूर्ण सौंदयरेपचार साखळीच सध्या धोक्यात आली आहे.

‘मोठमोठय़ा मॉलमध्ये असणाऱ्या पार्लरचे भाडे लाखांमध्ये असते. पण आर्थिक कमाई नसल्याने भाडे भरता येणार नाही. शिवाय कर्मचाऱ्यांच्या पगाराचाही प्रश्न आहे. स्वत:ची जागा असलेल्यांना बँकेचे हप्ते भरावे लागतात. कर्ज काढून नुकतेच सौंदर्योपचाराचे प्रशिक्षण घेतलेल्या मुलींचे काम सुरू होऊ शकलेले नाही. कित्येकजणींनी वधूला सजवण्यासाठी आगाऊ रक्कम घेऊन ठेवली आहे. ती परत मागितली जात आहे. सौंदर्योपचार जीवनावश्यक सेवा नसल्याने आमचा आवाज सरकापर्यंत पोहोचत नाही’, असे सौंदर्योपचार प्रशिक्षिका नीलिमा भोसले म्हणाल्या. या क्षेत्रातही हातावर पोट असणाऱ्या महिला आहेत. त्या घरोघरी जाऊन सेवा देतात. सध्या लांबवर जाणे शक्य नसले तरी जवळच्या परिसरात, ओळखीपाळखीतल्या ग्राहकांकडे जाऊन काम करण्याचा प्रयत्न या महिला करत आहेत.

‘दहापैकी सात स्पा व्यावसायिक बेकायदेशीर धंदे करतात. त्यामुळे प्रामाणिक स्पा व्यावसायिकालाही पोलिसांच्या जाचाला कायम सामोरे जावे लागते. त्यात आता टाळेबंदीचे संकट ओढवले आहे. दोन लाख रुपये जागेचे भाडे आहे. माझ्याकडे सहा कर्मचारी काम करतात. प्रत्येकाचा पगार २५ हजार रुपये. त्यांच्या राहण्यासाठी प्रत्येकी २० हजार रुपये भाडे आम्हीच भरतो. शिवाय ग्राहकांची त्वचा संवेदनशील असल्याने टाळेबंदीनंतर जुनी झालेली उत्पादने वापरता येणार नाहीत’, अशी माहिती ओरोम स्पाचे शर्मन रॉड्रिक्स यांनी दिली.

पूर्वी किमान दाढी घरातल्या घरात करण्याची सुविधा असायची. मात्र, गेल्या काही वर्षांत आकर्षक दाढी किंवा केस राखण्याकडे कल वाढल्याने सलूनचा व्यवसायही तेजीत आला होता. अनेकांनी मोठमोठे गाळे भाडय़ाने घेऊन तेथे सलून सुरू केले. या सलूनमध्ये काम करणाऱ्या कारागिरांना दररोजच्या कमाईतील ठरावीक हिस्सा रोजच्या रोज किंवा आठवडय़ाने दिला जातो. मात्र, गेल्या महिनाभरापासून हा व्यवसाय बंद असल्याने या कारागिरांची कमाईच पूर्णपणे थांबली आहे.

नागरिकांचीही गैरसोय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

महिनाभर केशकर्तनालये बंद असल्याने सर्वसामान्यांचीही अडचण होऊ लागली आहे. अनेकांना वाढलेल्या केस-दाढीनिशी घरात वावरावे लागत आहे. यावरून सध्या समाजमाध्यमांवर विनोदही प्रसारित होत आहेत. अनेकांनी घरातल्या घरात दाढी करण्यास सुरुवात केली आहे, तर काहींनी घरात उपलब्ध साधनांनिशी स्वत:चे केस कापून घेतल्याचे व्हिडीओही सध्या समाजमाध्यमांत चर्चेचा विषय आहेत. ब्युटी पार्लर बंद असल्याने महिलावर्गातही काहीशी नाराजी आहे.