महात्मा गांधींचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी हे सांगितलं जातं. पण, करमचंद गांधी हे मोहनदास यांचे वडील नसून एक मुस्लीम जमीनदार हे त्यांचे खरे वडील आहेत, असं वादग्रस्त वक्तव्य शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संस्थेचे प्रमुख मनोहर ऊर्फ संभाजी भिडे यांनी केलं आहे. यावरून शुक्रवारी ( २८ जुलै ) विधानसभेत विरोधी पक्षातील नेते आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी संभाजी भिडे यांच्या अटकेची मागणी केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “संभाजी भिडे यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत वादग्रस्त विधान केलं आहे. समाजात तेढ निर्माण करणाऱ्या संभाजी भिडेंनी कलम १५३ अंतर्गत अटक केली पाहिजे. अनेक वर्षापासून समाजात तेढ निर्माण करण्याचं काम ते करत आहेत.”

हेही वाचा : “रोहित पवार दोन तोंडी गांडूळ”, राम शिंदे यांची टीका; म्हणाले, “मी अजित पवारांकडे…”

“राष्ट्रपित्याबद्दल विधान केल्यानंतर ते बाहेर कसे फिरू शकतात. यानंतर काही प्रतिक्रिया उमटल्या तर याला जबाबदार कोण असणार आहे? त्यामुळे कलम १५३ अंतर्गत भिडेंना अटक केली पाहिजे,” अशी मागणी पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

यावर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी म्हटलं की, “पृथ्वीराज चव्हाण यांनी दिलेल्या माहितीची नोंद घेऊन सरकारने उचित कार्यवाही करावी.”

तर, “याची नोंदी घेतली आहे. चौकशी करून योग्य ती कार्यवाही करू,” असे एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sambhaji bhide arrested over mahatma gandhi statement say prithviraj chavan ssa
First published on: 28-07-2023 at 12:53 IST