मुंबई : केंद्रीय अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी गुरुवारी उच्च न्यायालयात धाव घेऊन त्यांच्याविरोधात भ्रष्टाचार वा खंडणीच्या आरोपाअंतर्गत गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआय किंवा राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपवण्याची मागणी केली आहे. त्यावर वानखेडे यांच्यावर सध्या कोणताही गुन्हा दाखल नाही. परंतु भविष्यात त्यांना अटक करायची झाल्यास ४८ तास आधी नोटीस दिली जाईल, अशी हमी राज्य सरकारने न्यायालयात गुरुवारी दिली.

न्यायमूर्ती नितीन जामदार आणि न्यायमूर्ती सारंग कोतवाल यांच्या खंडपीठासमोर गुरुवारी वानखेडे यांच्या याचिकेवर सुनावणी झाली. आर्यन खानच्या अटकेनंतर खंडणी व भ्रष्टाचाराचे आरोप केले जात असल्याने मुंबई पोलिसांकडून गुन्हा दाखल होण्याची भीती व्यक्त करून अटकेपासून संरक्षण देण्याची मागणी वानखेडे यांनी केली.

आरोपांच्या चौकशीसाठी चार जणांची समिती नेमण्याच्या मुंबई पोलिसांच्या निर्णयालाही वानखेडे यांनी आव्हान दिले आहे. सुनावणीच्या वेळी सरकारी वकिलांनी वानखेडे यांची याचिका आणि अटक होण्यापासून संरक्षण मिळण्याच्या मागणीला विरोध केला. आरोपांप्रकरणी आताच चौकशी सुरू करण्यात आली असून गुन्हा दाखल केलेला नाही, असे सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाला सांगितले असता वानखेडे यांना अटक करणार नाही, अशी हमी देऊ शकता का, अशी विचारणा न्यायालयाने केली. त्यावर वानखेडे हे केंद्रीय अधिकारी असून त्यांच्यावरील कारवाईपूर्वी आवश्यक ती परवानगी घ्यावी लागेल. तसेच त्यांना अटक करायची झाल्यास ४८ तास आधी त्याबाबतची नोटीस दिली जाईल, असेही सरकारी वकील अरुणा पै यांनी न्यायालयाल सांगितले.

निष्पक्ष चौकशी नाही..माझ्याविरोधात गुन्हा दाखल झाल्यास मुंबई पोलिसांकडून त्याची निष्पक्ष चौकशी होऊ शकत नाही. त्यामुळे प्रकरणाचा तपास सीबीआय वा एनआयएकडे सोपवण्याची मागणीही वानखेडे यांनी न्यायालयाकडे केली. सत्ताधारी पक्षातील एक नेता रोज नवे आरोप करून विनाकारण लक्ष्य करत असल्याचा आरोपही वानखेडे यांनी केला.

वानखेडे यांच्या पत्नी क्रोंती रेडकर यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श घेऊन मी वाढले. शिवसेना पाहतच लहानची मोठी झाले, असे नमूद करीत आपल्यावरील अन्याय दूर करावा, असे पत्र अमली पदार्थ नियंत्रण पथकाचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रोंती रेडकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविले आहे.

आपल्या कु टुंबावर दररोज हल्ला होत आहे. आज शिवसेनाप्रमुख  हयात असते तर त्यांना हे नक्कीच पटले नसते, असेही रेडकर यांनी पत्रात म्हटले आहे. शिवसेनाप्रमुखांची सावली व त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो, असेही त्यांनी  म्हटले आहे. तुमच्याकडे अपेक्षेने बघत असून, तुम्ही योग्य तो न्याय करा, अशी विनंतीही त्यांनी के ली आहे.