समीर वानखेडेंच्या नावे आहे बारचा परवाना; उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालात वाशीमधील ‘त्या’ रेस्ट्रॉ-बारचा उल्लेख

या रेस्ट्रॉ-बारचा फोटो राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनीही ट्विटरवरुन पोस्ट करत सामीर वानखेडेंवर निशाणा साधलाय.

Sameer Wankhede Sadguru Hotel
नवी मुंबईतील वाशीमध्ये आहे हे हॉटेल

राष्ट्रवादीचे प्रवक्ते आणि अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी पुन्हा एकदा अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधलाय. वानखेडे हे मुंबईमधील एका बार आणि रेस्तराँचे मालक असल्याचा दावा मलिक यांनी केलाय. ट्विटरवर सद्गुरु रेस्ट्रो बारचा फोटो शेअर करत मलिक यांनी निशाणा साधलाय.

“समीर दाऊद वानखेडे यांचे हे फर्जीवाडा केंद्र आहे,” अशा कॅप्शनसहीत नवाब मलिक यांनी हा फोटो शेअर केलाय. आज मलिक पत्रकार परिषद घेणार असून त्यामध्ये ते याच बाबतीत अधिक खुलासे करणार असल्याची शक्यता व्यक्त केली जातेय.

कुठे आहे हा बार
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार समीर वानखेडे यांच्या नावे बार आणि रेस्तराँचा परवाना आहे. नवी मुंबईमधील वाशी येथे हा बार आहे. उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार वाशीमधील सद्गुरु हॉटेलचा परवाना वानखेडे यांच्या नावे आहेत. हा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ रोजी जारी करण्यात आला आहे. तसेच हा परवाना रिन्यू करण्यात आला असून सध्या तो ३१ मार्च २०२२ पर्यंत पात्र आहे. या बारमध्ये परदेशी तसेच भारतीय बनावटीच्या दारुची विक्री करण्यास परवानगी देण्यात आलीय.

शाळेच्या दाखल्यावरुन आरोप…
गुरुवारीच मलिक यांनी वानखेडेंच्या शाळा दाखल्यावर ते ‘मुस्लीम’ असल्याची नोंद असल्याचा दावा केलाय. वानखेडे यांनी अनुसूचित जाती प्रवर्गाच्या खोट्या जात प्रमाणपत्राच्या आधारावर सरकारी नोकरी मिळविल्याच्या आरोपाचं समर्थन करण्यासाठी मलिक यांनी वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दाखल्यांवर मुस्लीम अशी नोंद असल्याची माहिती दिली. वानखेडे यांनी मुंबई पालिकेच्या दस्तऐवजांमध्ये खाडाखोड केल्याचा आरोपही त्यांनी केला.

धर्माच्या रकान्यामध्ये मुस्लीम असा उल्लेख
वानखेडे भारतीय महसूल सेवेतील (आयआरएस) अधिकारी आहेत. ते मुस्लीमधर्मीय असताना त्यांनी अनुसूचित जातीचे खोटे प्रमाणपत्र घेऊन सरकारी नोकरी मिळविल्याचा आरोप मलिक यांनी यापूर्वीच केला आहे. त्याच्या पुष्टय़र्थ त्यांनी गुरुवारी काही दस्तऐवज उघड केले. त्यात वानखेडे यांच्या शाळा सोडल्याच्या दोन दाखल्यांचा समावेश आहे. दोन्ही दाखल्यांवर ‘समीर दाऊद वानखेडे’ असे नाव असून, धर्माच्या रकान्यापुढे मुस्लीम अशी नोंद आहे.

आधीच्या पत्नीच्या भावाला अडकवल्याचा आरोप
मुंबई पालिकेतील सर्व नोंदी आम्ही तपासल्या आहेत. महापालिकेच्या दस्तऐवजांमध्ये त्यांनी १९९३ मध्ये खाडाखोड केल्याचे निदर्शनास आले आहे. उच्च न्यायालयासमोर महापालिकेची मूळ कागदपत्रे आम्ही सादर करणार आहोत, असे मलिक यांनी सांगितले. वानखेडे यांनी पहिल्या पत्नीला घटस्फोट दिला होता. ती आपल्याविरोधात कधीही उभी राहू शकते, या भीतीपोटी तिच्या चुलत भावाला अमली पदार्थ प्रकरणात फसवून अटक करण्यात आली. आमच्याविरोधात साक्ष दिली तर संपूर्ण कुटुंबाला तुरुंगात टाकू, अशी वानखेडे यांनी धमकी दिल्याचा आरोप मलिक यांनी केला. 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sameer wankhede had a bar and restaurant licence in his name in vashi hotel sadguru says nawab malik scsg

Next Story
पक्षांतर्गत राजकारणाला कंटाळून राष्ट्रवादीच्या प्रवक्त्याचा राजीनामा
ताज्या बातम्या