शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा आहे. ते बुद्धिबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार याविषयी आमच्या मनात शंका नाही, या शब्दांमध्ये उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पवारांच्या अमृतमहोत्सवी समारंभांच्या पार्श्वभूमीवर भाष्य केले आहे.
आज राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असून ‘सामना’तून त्यांचे अभिष्टचिंतन करताना त्यांना अनेक प्रश्न सोडवता आले असते, मग ते प्रश्न का सुटले नाहीत असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे. सामनाच्या अग्रलेखात म्हटलेय की, महाराष्ट्राच्याच नव्हे तर देशाच्या राजकारणावर छाप पाडणारी जी व्यक्तिमत्त्वे आज उरली आहेत त्यात शरद पवारांचा उल्लेख करावा लागेल. राजकारण चोवीस तास त्यांच्या धमन्यांतच खेळत असते. पवार कोणत्याही पदावर नाहीत. तरीही देशाच्या राजधानीत शरद पवार यांच्या अमृत महोत्सवी अभीष्टचिंतनाचा जंगी सोहळा दोन दिवस आधीच झाला. मराठी नेत्याचा इतका जंगी सोहळा देशाच्या राजधानीत कधीच झाला नसेल. देशाचे राष्ट्रपती, पंतप्रधान, सोनिया गांधी, मुलायम सिंग यादव, लालू यादव, पंजाबचे मुख्यमंत्री बादल, लालकृष्ण आडवाणी, फारुख अब्दुल्ला, नितीशकुमार, देशाचे संपूर्ण केंद्रीय मंत्रिमंडळ, राज्या-राज्याचे मुख्यमंत्री या सोहळ्यास पवारांच्या अभीष्टचिंतनासाठी हजर होते. पवारांनी त्यांच्या राजकीय जीवनात जे पेरले ते या सोहळ्यात उगवलेले दिसले, अशा शब्दात पवारांचे कौतुकही करण्यात आले आहे. त्यांनी १४ निवडणुका लढवल्या व ते अपराजित राहिले. शरद पवार यांच्या इतका प्रचंड क्षमतेचा नेता महाराष्ट्राच्या व देशाच्या राजकारणात झाला नाही. शासनावर मांड ठोकून राज्य कसे चालवावे याचे धडे नवख्यांनी शरदरावांकडूनच घ्यावेत, असेही सामनाच्या अग्रलेखात म्हटले आहे.
संग्रहित लेख, दिनांक 12th Dec 2015 रोजी प्रकाशित
शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा – शिवसेना
शरद पवारांची निवृत्तीची भाषा हा चकवा आहे. ते बुद्धिबळाचा राजकीय पट घेऊन एखादी चाल नक्कीच खेळत असणार याविषयी आमच्या मनात शंका नाही
Written by चैताली गुरवguravchaitali
First published on: 12-12-2015 at 14:18 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Samna editorial on sharad pawar