राज्यात करोनाचा वाढता प्रसार लक्षात घेऊन मुंबईतील लोकल सेवा बंद करण्यात आली होती. लॉकडाउनच्या सुरूवातीच्या टप्प्यानंतर अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सेवा सुरू करण्यात आली. मात्र, सर्वसामान्यांसाठीही लोकल सेवा खुली करावी, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं केली होती. या मागणीकडे लक्ष राज्य सरकारचं लक्ष वेधण्यासाठी मनसेनं सविनय कायदेभंग करण्याचा इशारा दिला होता. त्याप्रमाणे आज सकाळी मनसे पदाधिकाऱ्यांनी लोकलमधून प्रवास करत सविनय कायदेभंग केला.

लोकलमधून सर्वसामान्यांना प्रवास करण्यास मूभा नसल्यानं एसटी व इतर वाहनांमधून नागरिकांची परवड होत असल्याचं चित्र आहे. याकडे मनसेनं लक्ष वेधत लोकल प्रवास सर्वसामान्यांसाठीही खुला करण्याची मागणी केली होती. “लॉकडाउनमध्ये रेल्वे सेवा बंद आहे. मात्र बससेवा सुरु करण्यात आली आहे. बसमध्ये लोकांचे प्रचंड हाल होत आहेत. लोकांना आपापल्या घरी पोहोचण्यासाठी आठ तासांचा कालावधी लागत आहे. कल्याण, डोंबिवली, पालघर या ठिकाणांहून येणाऱ्या प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहे. सरकारला विनंती केली परंतु ते ऐकत नाहीत. त्यामुळे येत्या सोमवारी मनसेतर्फे सविनय कायदे भंग करत आम्ही रेल्वे प्रवास करणार आहे,”असं देशपांडे म्हणाले होते.

दिलेल्या घोषणेप्रमाणे मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी सकाळी लोकलमधून प्रवास केला. यावेळी प्रवासाचा व्हिडीओ देशपांडे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. “आम्ही अनेकवेळा सरकारला विनंती केली होती की, रेल्वे चालू करा. सर्वसामान्यांसाठी रेल्वे चालू करा. बसमध्ये करोना पसरत नाही, पण लोकलमधून पसरतो, असा सरकारचा समज झाला असावा. आज आम्ही कायदेभंगाची हाक दिली होती. त्याप्रमाणे नाकावर टिच्चून आम्ही हा रेल्वे प्रवास करत आहोत, जय महाराष्ट्र,” अशी टीका देशपांडे यांनी सरकारवर केली आहे.

बसचा शेअर केला होता व्हिडीओ

“बसच्या गर्दीत करोना होत नाही पण रेल्वेच्या गर्दीत होतो असा सरकारचा समज आहे का?,” असा सवाल मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला होता. “तसंच रेल्वे सेवा सुरू करा अन्यथा सविनय कायदेभंग करावा लागेल,” असा इशाराही त्यांनी दिला होता.