Sandeep Deshpande : आगामी विधानसभा निवडणुकीची घोषण झालेली नसली सर्व राजकीय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. अशातच मनसेने काल दोन उमेदवारांच्या नावाची घोषणाही केली आहे. याशिवाय वरळी मतदारसंघातून मनसे नेते संदीप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. यावरून काल वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांनी संदीप देशपांडे यांच्यावर खोचक शब्दात टीका केली. मला वाटलं की मनसे जो बायडन यांना उमेदवारी देते की काय? असं आदित्य ठाकरे म्हणाले. दरम्यान, या टीकेला आता संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

संदीप देशपांडे यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना आदित्य ठाकरे यांच्या टीकेबाबतही विचारण्यात आलं. यासंदर्भात बोलताना, जो बायडेन यायला तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात का? असा टोला संदीप देशपांडे यांनी लगावला.

हेही वाचा – Aditya Thackeray : “पाच वर्षानंतर पक्ष झोपेतून उठला”, आदित्य ठाकरेंची राज ठाकरेंवर खोचक टीका

नेमकं काय म्हणाले संदीप देशपांडे?

“आदित्य ठाकरे यांना आता साडेचार वर्षांनंतर जाग आली आहे. ते आता मतदारसंघातील विषयांसंदर्भात बैठका घेत आहेत. आजही त्यांनी माढाच्या कार्यालयात बैठक घेतली. मात्र, मागच्या साडेचार वर्षात त्यांना महापालिकेत एकही बैठक घेता आली नाही. मुळात आता आदित्य ठाकरे यांची झोप उडाली आहे. त्यामुळे ते बैठका घेत आहेत”, अशी टीका संदीप देशपांडे यांनी केली.

“…मग तुम्ही काय डोनाल्ड ट्रम्प आहात का?”

पुढे बोलताना ते म्हणाले, “आदित्य ठाकरे म्हणतात, की मनसेने वरळीतून जो बायडेन यांना उमेदवारी दिली की काय, असं त्यांना वाटलं, पण तुमच्या समोर जो बायडेन उभे राहायला तुम्ही डोनाल्ड ट्रम्प आहात का? खरं तर आदित्य ठाकरे आज-काल काहीही बोलत आहेत. कारण त्यांच्याकडे प्रश्नांची उत्तरे नाही.”

“आदित्य ठाकरेंनी वरळीतल्या लोकांनाही महत्त्व दिले नाही”

दरम्यान, आदित्य ठाकरे यांनी काल मनसे हा पक्ष पाच वर्ष झोपा काढतो आणि निवडणुकीच्या वेळी जागा होतो, अशी टीका केली होती. या टीकेलाही संदीप देशपांडे यांनी प्रत्युत्तर दिलं. “आज आम्ही जनतेची कामं करतो आहे. हे बघून आदित्य ठाकरे यांना जाग आली आहे. तेच मागच्या चार वर्षांपासून झोपले होते. खरं तर आदित्य ठाकरे यांनी मागच्या साडेचार वर्षात वरळीतल्या लोकांनाही महत्त्व दिलं नाही. त्यामुळे या निवडणुकीत वरळीतली जनताही त्यांना महत्त्व देणार नाही”, असे ते म्हणाले.

हेही वाचा – केंद्र सरकारचा इतका ‘महाराष्ट्र द्वेष’ कशासाठी? महामार्गांच्या दुर्दशेवरून आदित्य ठाकरे यांचा सवाल

आदित्य ठाकरेंनी नेमकी काय टीका केली होती?

आदित्य ठाकरे यांनी काल माध्यमांशी बोलताना मनसेवर जोरदार टीका केली होती. “मनसे पाच वर्षानंतर झोपेतून उठलेला पक्ष आहे. ते निवडणुकीच्या काळात जागे होतात. मग महाराष्ट्र पिंजून काढतात. हा एक सुपारीबाज पक्ष आहे. ते त्यांचं काम करतील. आम्ही आमचं जनतेच्या सेवेचं काम करत आहोत. गेल्या पाच वर्षांच्या काळात मनसे हा पक्ष कुठेही दिसला नाही. त्यामुळे आम्ही त्यांच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. सुपारीबाज पक्ष आहे तो तिथेच राहिल”, असं आदित्य ठाकरे म्हणाले होते. दरम्यान, वरळी मतदारसंघामधून मनसे नेते संदिप देशपांडे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे, याबाबत विचारलं असता, “मला वाटलं बायडन येत आहेत”, असा टोलाही त्यांनी लगावला होता.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.