भाजपाचे नेते निलेश राणेंनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना औरंगजेब म्हणत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर आता शिवसेनेच्या (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी या टीकेला प्रत्युत्तर दिलं आहे. “भाजपाच्या उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो,” असा आरोप करत संजय राऊतांनी राणेंना खडसावलं.

संजय राऊत म्हणाले, “शिंदे-फडणवीस सरकार आम्ही कसं संभाजीनगर केलं, आम्ही कसं धाराशीव केलं अशा टिमक्या वाजवल्या होत्या. त्यावर त्यांच्याच लोकांनी त्यांना प्रश्न विचारले पाहिजे. औरंगाबादचं संभाजीनगर नामांतर बाळासाहेब ठाकरेंनी केलं. उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री असताना त्यावर निर्णय घेतला. यांनी नंतरच्या काळात त्याचा श्रेय लाटण्याचा प्रयत्न केला.”

“भाजपाला सध्या औरंगजेबाविषयी इतकं प्रेम का आलं?”

“भाजपा आज संभाजीनगरला वारंवार औरंगाबाद म्हणत आहे. धाराशीवला उस्मानाबाद म्हणत आहे. याचा काय अर्थ घ्यायचा. भाजपाचं हिंदुत्व कुठे गेलं आहे. भाजपाला सध्या औरंगजेबाविषयी इतकं प्रेम का आलं. त्यांनी याचं उत्तर द्यावं,” असं मत संजय राऊतांनी व्यक्त केलं.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हेही वाचा : “शरद पवार म्हणजे औरंगजेबाचा पुनर्जन्म, निवडणूक आली की…”, भाजपा नेते निलेश राणेंचं खोचक ट्वीट व्हायरल!

“भाजपाच्या उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो”

“भाजपाच्या उथळ नेत्यांना महाराष्ट्रातील नेत्यांमध्ये औरंगजेब दिसतो. त्यांनी त्यांच्या मनातील औरंगजेब आधी काढला पाहिजे,” असं म्हणत त्यांनी निलेश राणेंना टोलाही लगावला.