मुंबई : अदानीची हंडी फोडून मलई खाणारे आणि धारावीसह मुंबईतील मोक्याचे भूखंड त्यांच्या घशात घालणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे ‘ जोकर ’ असल्याचे टीकास्त्र शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सोडले. तर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या ५२ पत्त्यांच्या गड्डीत सर्वच जोकर असून जनतेने त्यांना ‘ महाजोकर ’ करुन घरी बसविले आणि फडणवीस मुख्यमंत्री झाले, ही वस्तुस्थिती ‘ माकडछाप ’ राऊत यांनी लक्षात घ्यावी, असे प्रत्युत्तर भाजपच्या माध्यम विभागाचे प्रमुख नवनाथ बन यांनी दिले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने शिवसेना-भाजपच्या नेत्यांची टीकेची भाषा घसरत चालली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यानंतर राजकारणात फडणवीस हे जोकर असल्याची टीका राऊत यांनी केली होती. मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचाराची हंडी फोडणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केले होते. त्यावर आम्ही महापालिकेच्या ९० हजार कोटी रुपयांच्या ठेवी बँकेत ठेवल्या होत्या. आम्ही पालिका लुटली असती, तर एवढ्या ठेवी कशा ठेवल्या असत्या.? उलट हे ९० हजार कोटी रुपये महायुती सरकारने लुटले आहेत. फडणवीस हे अदानींना मुंबईतील मोक्याच्या जमिनी देऊन मुंबई लुटत आहेत आणि भ्रष्टाचार करीत असल्याची टीका राऊत यांनी केली होती. राज्याच्या तिजोरीत पैसे नाहीत, पण दोन लाख कोटी रुपयांची कामे ज्यांनी कंत्राटदारांना दिली, त्यांना २५ टक्के कमिशनचे पैसे मिळाले आहेत. त्यात फडणवीस यांच्या सहकाऱ्यांचा समावेश असल्याचा आरोप राऊत यांनी केला.
राऊत यांच्या टीकेमुळे भाजपमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली. ‘ एकतर तू राहशील किंवा मी राहीन ’ असे आव्हान ठाकरे यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी फडणवीस यांना दिले होते. जनतेने फडणवीस यांना भक्कम साथ देवून मुख्यमंत्रीपदी बसविले व ठाकरे यांना घरी पाठविले, असे बन यांनी स्पष्ट केले. फडणवीस हे विकासाचे थर लावत आहेत आणि भ्रष्टाचाराची हंडी फोडत आहेत. त्यामुळेच तुम्हाला झळ बसत आहे. खरे महाजोकर तुम्ही आणि ठाकरे गट असल्याचे मुंबईकर आणि मराठी माणूस दाखवून देईल, असे बन यांनी नमूद केले.
ठाकरे हे लुटारूंचे सरदार आहेत. त्यामुळे राऊत यांनी कमिशनच्या बाता मारू नयेत. ठाकरे यांचा दुसरा ‘मातोश्री ’ बंगला कोणाच्या कमिशनवर उभा राहिला, याचे उत्तर आधी द्यावे. मृतावरच्या टाळुवरील लोणी खाणारे राऊत आहेत, अशी टीका बन यांनी केली.