शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना अखेर जामीन मिळाला आणि ते ऑर्थर रोड तुरुंगातून बाहेर आले. यानंतर पत्रकारांनी संजय राऊत यांना तुम्हाला जामीन मिळाल्यानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांना जामीन मिळणार का? असा प्रश्न विचारला. त्यावर संजय राऊतांनी थेट मुद्द्यावर न बोलता एका वाक्यात प्रतिक्रिया दिली. ते बुधवारी (९ नोव्हेंबर) मुंबईतील सिद्धिविनायकाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तुमच्या जामिनानंतर अनिल देशमुख आणि नवाब मलिकांनाही जामीन मिळणार का? या प्रश्नावर मात्र संजय राऊतांनी थेट प्रतिक्रिया देणं टाळलं. ते म्हणाले, “माझा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे आणि आज तो विश्वास वाढला आहे.”

“मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही”

संजय राऊतांनी यावेळी त्यांच्या अटकेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “मी ४० वर्षांहून अधिक काळ पत्रकारिता करत आहे. ३० वर्षांपेक्षा अधिक काळ मी सामनासारख्या महाराष्ट्रातील महत्त्वाच्या दैनिकाचा कार्यकारी संपादक आहे. मी १८-२० वर्षांपासून खासदार आहे, माझ्या पक्षाचा नेता आहे. अशा व्यक्तिला केंद्रीय तपास संस्था अटक करते. आम्ही कायदेशीर लढाई लढली. मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीच चुकीचं काम केलं नाही.”

“मी १०० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात घालवले आहेत”

“एकमेकांशी राजकीय मतभेद असतात. लोकशाही आहे त्यामुळे असे मतभेद होत राहतील. मात्र, मी १०० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात घालवले आहेत. मी हे कधीच विसरणार नाही. असं असलं तरी माझी कोणावरही नाराजी नाही. मला आपल्या देशाच्या न्यायव्यवस्थेने न्याय दिला आहे. त्यासाठी मी आपल्या न्याय व्यवस्थेचा आभारी आहे,” असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : “संजय राऊतांना विनाकारण अटक”, न्यायालयाने टोचले ईडीचे कान; वाचा काय म्हटलंय आदेशात!

“ऑर्थर रोडचा असो की अंदमान, तुरुंग हा तुरुंगच असतो”

“ऑर्थर रोड असो की अंदमान, तुरुंग हा तुरुंगच असतो. मी १०० दिवसांपेक्षा अधिक काळ तुरुंगात होतो. याचं काय कारण आहे, माझा काय गुन्हा आहे? मला तुरुंगात का पाठवण्यात आलं हे मला अद्यापही माहिती नाही,” असंही संजय राऊत यांनी नमूद केलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sanjay raut comment on bail of anil deshmukh nawab malik in mumbai pbs
First published on: 09-11-2022 at 21:48 IST